Pune Crime News । चोरीचा आरोप करुन बदनामी केल्याने हॉटेल कामगाराने मोबाईलवर सुसाईड नोट लिहून रेल्वे खाली उडी मारुन आपले जीवन संपविले; प्राणा बँक्वेट अ‍ॅड रिसॉर्टचे संचालक आणि एचओडी यांच्यावर गुन्हा दाखल

Pune Crime News | Hotel worker ends life by jumping under train after being accused of theft and defamed; Case registered against director and HOD of Prana Banquet Ad Resort

पुणे : Pune Crime News | हॉटेलमध्ये त्रास देत असल्याने राजीनामा दिलेल्या हॉटेल कामगारावर चोरीचा आरोप करुन तसेच  त्याच्याकडून लिहून घेऊन बदनामी केली. त्यामुळे या हॉटेल कामगाराने मोबाईलमध्ये सुसाईड नोट लिहून रेल्वेखाली उडी मारुन आपले जीवन संपविले. फुरसुंगी पोलिसांनी प्राणा बँक्वेट अ‍ॅड रिसॉर्टचे (Prana Resorts & Banquets) संचालक आणि एचओडी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अतुल लक्ष्मण अहिरे (वय २२, रा. प्राणा बँक्वेट अ‍ॅन्ड रिसोर्ट, रावेत) असे मृत्यु पावलेल्या हॉटेल कामगाराचे नाव आहे. त्याचा भाऊ स्वप्निल लक्ष्मण अहिरे (वय २९, रा. शिव प्रतिष्ठान कॉलनी, पापडे वती, हवेली) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार फुरसुंगीमधील भोसले व्हिलेजजवळ सासवड रोड रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे मार्गावर २३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजण्यापूर्वी घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल अहिरे हा मुळचा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील शिंडादा येथील राहणारा होता. अतुल अहिरे हा मागील ६ महिन्यांपासून प्राणा बँक्वेट अ‍ॅन्ड रिसोर्ट या हॉटेलमध्ये कामाला होता. हॉटेलचालकांनी त्याची रहायची सोय केली होती. फिर्यादी हे विमाननगर येथे नोकरी करतात. तो फिर्यादी यांना अधून मधून फोन करुन हॉटेलमधील डायरेक्टर हे त्रास देतात. वेळेवर पगार देत नाही, असे सांगत होता. अतुल याने हॉटेलचा राजीनामाही दिला होता. परंतु तेथील डायरेक्टर यांनी तो मंजुर केला नाही. त्यामुळे अतुल अहिरे हा मानसिक तणावात होता.

२१ फेब्रुवारी रोजी फिर्यादी हे त्यांच्या भावाला भेटायला त्याच्या रुमवर गेले होते. तेव्हा त्याने तो काम करत असलेले काम सोडणार आहे, त्याला त्याचे कामाचे ठिकाणी त्रास होत आहे़, असे सांगितले. त्यावेळी त्याचे मॅनेजरचा त्याला कामावर येण्याकरीता फोन आला.  परंतु, त्याला कामावर जायचे नव्हते. फिर्यादी यांनी मॅनेजर याला तो कामावर येणार नाही, असे सांगितले. परंतु, त्याला कामावर यावेच लागेल, असे मॅनेजर यांनी सांगितले. त्यामुळे अतुल अहिरे हा खूप घाबरला व कामावर निघून गेला. फिर्यादी यांनी हॉटेलवर जाऊन एच आर ला भेटण्यासाठी व भावाला का त्रास देत असल्याबाबत विचारणा करण्यासाठी गेले होते. परंतु, तेथील स्टाफने त्यांना एच आर ची भेट घेऊ न देता गेटवरुन परत पाठविले.

त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी अतुल याला फोन केले असता त्याने तो फुरसुंगी येथे येणार आहे़ त्याला काही त्रास आहे, याबाबत सांगणार आहे, असे फोनवर सांगितले. त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी त्याला फोन केला असता त्याने फोन उचलला नाही. रात्री साडेअकरा वाजता फोन केल्यावर पोलिसांनी फोन उचलला. अतुल अहिरे याचा फोन चेक केल्यावर त्यामध्ये त्याने सुसाईड नोट लिहिली होती. तो काम करत असलेल्या ठिकाणी चोरीचा आरोप लावण्यात आला होता. त्याने चोरी केली नाही़ त्याचेवर खोट आरोप केले. त्याचे काही एक ऐकले नाही. त्याला तेथील स्टाफने मारहाण केली. त्याला हेड ऑफिसला बोलावून घेतले.

प्रापर्टी डायरेक्टर व एचओडी यांनी मारुन मारुन त्याने चोरी केली, हे कबुल करायला मजबुर केले. रुम टॅरीफमध्ये येणारे गेस्ट १ हजार, २ हजार रुपये घेतले असा आरोप केला. मारुन मारुन लेटर साईन करुन घेतले. त्यांच्या अशा वागण्यामुळे खुप बदनामी केली. माझ्या काळजाला धक्का बसेल, असे कृत्य केले आहे. तसेच खूप घाण पद्धतीने शिवीगाळ केली. यांचे अशा हॅरेशमेंन्टनी बदनामी सहन करणारा मी व्यक्ती नाही. मला जगावसे वाटत नाही, मी जीव देत आहे, असा मेसेज मोबाईलमध्ये लिहिलेला होता. यावरुन हॉटेलचे  एचओडी व प्रापर्टी डायरेक्टर तरुण साचवाणी यांनी मानसिक व शारीरीक त्रास देऊन अतुल अहिरे याला मारहाण केली. त्यातून अतुल याने आपले जीवन संपविल्याची फिर्याद त्यांच्या भावाने दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास करीत आहेत. 

You may have missed