Pune Crime News । नकार देणार्या तरुणीच्या नावाने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे बदनामी करणार्या लिंगपिसाटास शिवाजीनगर पोलिसांनी केले जेरबंद, १० ते १५ तरुणींची केली बदनामी
पुणे : Pune Crime News । तरुणीशी ओळख काढून त्यांना तो प्रपोज करायचा. तिने नकार दिल्यास तिच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करुन ती कॉलगर्ल असल्याचे भासवुन तिची बदनामी करणार्या लिंगपिसाटास शिवाजीनगर पोलिसांनी विरारहून जेरबंद केले. पोलिसांनी त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे सेक्सटॉईज व इतर सेक्स विषयक साहित्य आढळून आले.
रमेश सुरेश म्हात्रे Ramesh Suresh Mhatre (वय ४०, रा. ठाणे सध्या वसई, विरार) असे या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीच्या नावाने इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर तिच्या नावाने कोणीतरी एक बनावट अकाऊंट तयार करुन तिच्या खासगी फोटोचा वापर केला. या अकाऊंटवर चारित्र्याबाबत अश्लील आक्षेपार्ह मजकुर प्रसारित करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याने समाजामध्ये बदनामी झाली.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सायबर सेलने या गुन्ह्यात कोणताही पुष्टीदायक धागादोरा नसताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करुन रमेश म्हात्रे याचे नाव निष्पन्न केले. त्यानंतर त्याचा मोबाईल प्राप्त केला. त्याचा वसई विरार परिसरात शोध घेऊन त्याला २८ फेब्रुवारी रोजी अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यावर मागील काही वर्षापूर्वी तो फिर्यादी यांच्या घरी भाड्याने राहण्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी त्याचे फिर्यादी याच्याशी झालेल्या किरकोळ वादावरुन फिर्यादी यांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने त्याने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट उघडून त्याने त्यावर अश्लिल मजकूर टाकला होता.
रमेश म्हात्रे हा मुळचा ठाणे येथील रहायला होता. त्याने आपल्या वहिनीच्या बाबतीतही असाच प्रकार केल्याने भावाने त्याला घरातून हाकलून दिले आहे. तो वेटर, सिक्युरिटी गार्ड म्हणून मिळेल तेथे काम करतो. त्याला एखादी तरुणी आवडली तर तो तिच्याशी ओळख करुन घेतो. तिचा मोबाईल नंबर मिळवितो. ओळख झाल्यानंतर तिला प्रपोज करतो. तिने त्याला नकार दिल्यावर तिला धडा शिकविण्यासाठी या तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट उघडून ती कॉल गर्ल असल्याचे भासवितो. त्यानंतर या तरुणीला अश्लिल फोन येण्यास सुरुवात होते. दरम्यानच्या काळात तो घरे बदलत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पोलिसांनी त्याच्या मोबाईलची तपासणी केल्यावर त्यामध्ये किमान १० ते १५ तरुणींचे फोटो आढळून आले. त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा तेथे सेक्सटॉईज, सेक्सविषयक साहित्य आढळून आले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीशकुमार दिघावकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे, पोलीस अंमलदार नलिनी क्षीरसागर, पोलीस अंमलदार तेजस चोपडे व आदेश चलवादी यांनी केली आहे.
