Parshuram Wadekar | विशेष मुलांच्या रंगपंचमीमध्ये उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा उत्स्फूर्त सहभाग

Parshuram Wadekar | Deputy Mayor Parshuram Wadekar's spontaneous participation in Rangpanchami for special children

पुणे : Parshuram Wadekar |  रंगपंचमीच्या निमित्ताने भोई प्रतिष्ठान तर्फे आयोजित ३१ वा रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. पुणे शहरातील अनाथ मुले, मूकबधिर विद्यार्थी, रस्त्यावरील गरजू मुले तसेच अंध विद्यार्थ्यांसमवेत दरवर्षीप्रमाणे यंदाही हा रंगोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी उपस्थित राहून विशेष मुलांबरोबर रंगांची उधळण केली.

कार्यक्रमादरम्यान मुलांनी एकमेकांना विविध रंग लावत आनंद साजरा केला. भगवा, निळा, हिरवा, गुलाबी, पिवळा, नारंगी अशा विविध रंगांनी संपूर्ण परिसर रंगून गेला होता. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहून उपस्थितांचे मन भारावून गेले.

यावेळी बोलताना उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले, “उपमहापौर म्हणून मला या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आणि या सर्व मुलांबरोबर रंगपंचमी खेळण्याची संधी लाभली, हे माझे भाग्य आहे. या चिमुकल्यांनी प्रेमाने मला रंग लावला. जसे हे विविध रंग एकत्र येऊन सुंदर चित्र तयार करतात, तसेच आपला भारत देश आणि आपले संविधान विविधतेने नटलेले आहे. अनेक जाती-धर्म, परंपरा आणि संस्कृती यांची सांगड घालत आपण एकात्मतेचा संदेश देत आहोत.”

कार्यक्रमात विविध सामाजिक संस्थांनी नाश्ता, पाणी व जेवणाची व्यवस्था केली होती. विशेष म्हणजे एका मुस्लिम कुटुंबीयांनी शिरकुरमा आणून सणात सहभाग नोंदवला. विविध धर्म व समाजघटक एकत्र येऊन हा रंगोत्सव साजरा करत असल्याचे चित्र पाहून सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा सुंदर संदेश देण्यात आला.

या रंगोत्सवात सहभागी होताना लहानपणच्या आठवणी ताज्या झाल्याची भावना व्यक्त करत वाडेकर म्हणाले की, “जे मुले रंगांपासून वंचित राहतात, त्यांच्यासोबत होळी खेळण्याची आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरता आले, याचा खरा समाधान आहे.”

या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, स्टॅंडिंग कमिटी चेअरमन श्रीनाथ भिमाले, उद्योजक कृष्णकुमार गोयल तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे प्र-कुलगुरू पराग कळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

You may have missed