Maharashtra Weather | उष्णतेचा तडाखा वाढला; पुढील 12 तासांसाठी सतर्कतेचा इशारा, पुण्यातील स्थिती काय?
मुंबई : Maharashtra Weather | महाराष्ट्र राज्यात उन्हाचा कडाका वाढू लागला असून, पुढील १२ तासांत उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत कमाल तापमान झपाट्याने वाढत आहे. काही शहरांमध्ये पारा ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचला असून, दुपारच्या वेळेत उष्ण आणि दमट हवामान जाणवत आहे.
४ मार्च रोजी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून, कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळेल. हवामान खात्याने नागरिकांना दुपारी ११ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. उन्हात बाहेर पडताना डोक्यावर टोपी, गॉगल किंवा ओढणी वापरावी तसेच हलके, सैल आणि सूती कपडे परिधान करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. शरीरात पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पुरेसे पाणी, ताक, लिंबूपाणी किंवा इतर द्रवपदार्थ घ्यावेत.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल ३३-३७ अंश सेल्सियस, किमान २२-२२ अंश राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. आज मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. पुण्यात कमाल ३२-३५ अंश, किमान १६-१९ अंश राहण्याची शक्यता आहे.
