Ration Card | रेशन कार्डसाठी आर्थिक निकष बदलणार; अधिक कुटुंबांना स्वस्त धान्याचा लाभ
मुंबई : Ration Card | वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार रेशन कार्डच्या प्राधान्य कुटुंब योजनेसाठी असलेल्या आर्थिक निकषांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. सध्या शहरी भागात वार्षिक ५९ हजार रुपये तर ग्रामीण भागात ४४ हजार रुपये अशी उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र ही मर्यादा अनेक वर्षांपासून बदललेली नसल्याने महागाई वाढत असताना अनेक गरजू कुटुंबे या योजनेपासून वंचित राहत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सरकारने आता या उत्पन्न निकषांचा फेरविचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्यातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून सुधारित उत्पन्न मर्यादेबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित तहसीलदारांकडून माहिती गोळा करून हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठवला जाणार आहे. या अहवालांच्या आधारे राज्य सरकार नवीन उत्पन्न मर्यादा निश्चित करण्याची शक्यता आहे.
सध्या प्राधान्य कुटुंब योजनेत समावेशासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असले तरी विद्यमान उत्पन्न मर्यादेमुळे अनेक अर्ज नाकारले जातात. त्यामुळे पात्र असूनही अनेक कुटुंबांना स्वस्त धान्याचा लाभ मिळत नाही. उत्पन्न मर्यादा वाढविल्यास हजारो नव्या कुटुंबांचा या योजनेत समावेश होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शासनाने यापूर्वी सक्षम कुटुंबांनी स्वेच्छेने रेशनचा लाभ सोडावा यासाठी ‘गिव्ह इट अप’ मोहीमही राबवली होती. मात्र या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचे प्रमाण संतुलित करण्यासाठी आणि अधिक गरजू कुटुंबांना मदत मिळावी यासाठी आर्थिक निकष बदलण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. शासनाने सुधारित निकष निश्चित केल्यानंतर राज्यातील मोठ्या संख्येने कुटुंबांना स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
