Sandeep Khardekar | पुण्यात वानर टोळ्यांची घुसखोरी; नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्याकडून वन विभागाला निवेदन
पुणे : Sandeep Khardekar | शहरात उन्हाळा सुरू होताच अन्न आणि पाण्याच्या शोधात वानरांच्या टोळ्यांनी घुसखोरी केल्याचे प्रकार समोर येत आहेत. नारायण पेठेतील पुणे महापालिकेच्या हरिभाऊ साने वाहनतळ परिसरात अलीकडेच वानरांची एक टोळी दाखल झाली आहे.
यापूर्वी कोंढवे धावडे परिसरात, खडकवासला धरणालगत रस्त्यावरही अशाच प्रकारे वानरांच्या टोळ्यांनी ठाण मांडल्याचे दिसून आले होते. सुदैवाने अद्यापपर्यंत कोणावर हल्ला किंवा इजा झालेली नसली तरी मध्यवस्तीतील लहान मुलांसाठी आणि नागरिकांसाठी धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाशी संपर्क साधला असता, रेस्क्यू सेंटर वन विभागाच्या सूचनेनुसार बंद असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे याबाबत वन विभागाने तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी वन विभागाला निवेदन देत नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच जनतेला सतर्कतेच्या सूचना द्याव्यात, अशी आग्रही मागणी केली आहे.
