Aishwarya Surendra Pathare | पुण्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; तातडीने उपाययोजना करण्याची नगरसेविका ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांची मनपा प्रशासनाकडे मागणी
पुणे : Aishwarya Surendra Pathare | शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष धोका निर्माण झाला आहे. काही भागांमध्ये कुत्र्यांची टोळकी तयार होत असून दिवसाढवळ्या हल्ल्यांच्या घटना घडत आहेत.
चाकण परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांमुळे रेबीजसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका, चावण्याच्या घटनांमुळे संसर्ग, तसेच अपघातांची शक्यता वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची अधिकृत गणना, मोठ्या प्रमाणावर नसबंदी आणि लसीकरण मोहीम, ओळख पटवण्यासाठी कॉलर किंवा टॅग, आक्रमक कुत्र्यांचे पुनर्वसन, निवारा केंद्रांची उभारणी, कचरा व्यवस्थापन सुधारणा, २४x७ तक्रार निवारण यंत्रणा आणि चावण्याच्या घटनांमध्ये तत्काळ वैद्यकीय मदत व नुकसानभरपाई यांसारख्या उपाययोजना राबवण्याची मागणी पुढे आली आहे.
नगरसेविका ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी या संदर्भात पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे ठोस आणि कालबद्ध कृती आराखडा जाहीर करण्याची मागणी केली आहे.
मागण्या खालील प्रमाणे आहेत..
1. पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांची अधिकृत गणना (survey) तात्काळ करावी.
2. मोठ्या प्रमाणावर नसबंदी (ABC) आणि रेबीज लसीकरण मोहिम राबवावी.
3. लसीकरण झालेल्या कुत्र्यांना स्पष्ट ओळख (ear-tag/collar) देण्यात यावी.
4. आक्रमक व धोकादायक कुत्र्यांना तातडीने पकडून वेगळ्या ठिकाणी हलवावे.
5. भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्रे उभारण्यात यावीत.
6. कचरा व्यवस्थापन कडक करून कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रणात आणावी.
7. नागरिकांसाठी 24×7 तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत करावी.
8. कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांवर तातडीने वैद्यकीय मदत व नुकसानभरपाई द्यावी.
