Pune Crime News | सासरी होणार्या त्रासातून नवीन कात्रज बोगद्यावरील डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या करण्यास गेलेल्या महिलेचे पोलिसांनी वाचविले प्राण
पुणे : Pune Crime News | सासरी होणार्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्येचा विचार करुन नवीन कात्रज बोगद्यावरील डोंगरावर गेल्या़ डोंगराच्या कड्यावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा विचार करत असतानाच पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिचे समुपदेशन करुन तिला वाचविले. ही घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
नवीन कात्रज बोगद्याशेजारील डोंगरावर एक महिला दिसून आली. ती बोगद्याला लागून असलेल्या डोंगराच्या कड्यावर उभी होती. तेथून जाणार्या लोकांनी हे पाहून आंबेगाव पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमळकर, फिरोज मुलाणी व त्यांच्या सहकार्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली. ही माहिती अग्निशामक दल व रुग्णवाहिकांना कळविली. ते ही तातडीने घटनास्थळी पोहचले. ही महिला डोंगराच्या २०० ते २५० फुट उंच कड्यावर उभी होती. खाली अग्निशामक दल व रुग्णवाहिका यांचे कर्मचारी जाळी घेऊन उभे होते. त्यानंतर पोलीस डोंगराच्या कड्यावर दुसर्या बाजूने पोहचले. पोलिसांनी या महिलेचे समुपदेशन करुन तिचे मन वळविले. खालच्या बाजूलाही मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तिच्याशी संवाद साधून तिचे मन परिवर्तन केले. त्यामुळे ही महिला कड्यावरुन खाली आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. सासरी होत असलेल्या कौटुंबिक वादातून आपण आत्महत्या करण्यासाठी कड्यावर गेल्याचे तिने सांगितले.
आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली.
