Pune Crime News | आरटीओकडे नोंदणी न करता बनावट नंबरप्लेट लावून प्रवासी वाहतूक करणार्‍या ट्रॅव्हल्सचालकावर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नोंदणी न करता ट्रॅव्हल्सला वेगवेगळे बनावट नंबरप्लेट वापरुन खासगी वाहतूक करणार्‍या ट्रॅव्हल्सचालकावर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

किरण पांडुरंग भिसे Kiran Pandurang Bhise (रा. काळेबोराटेनगर, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत तुषार सुभाष दराडे (वय ३०, रा. काळेबोराटे नगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२५ पासून सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार दराडे यांची स्वत:ची टेम्पो ट्रॅव्हल्स आहे. त्यांच्या परीसरामध्ये किरण भिसे राहत असून त्याने ऑगस्ट २०२५ मध्ये पांढर्‍या रंगाची ट्रॅव्हल्स विकत घेतली होती. त्यानंतर २ ते ३ दिवसांनी तो त्याची ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतूकीकरता रवी दर्शन चौक येथे घेऊन जात होता. त्यावेळी त्याच्या ट्रॅव्हल्सला एम एच १४ एम ई ६७९७ हा क्रमांक लावला असल्याचे दिसले. १६ ऑक्टोंबर २०२५ रोजी ते टेम्पो ट्रॅव्हल्स घेऊन आळंदीला जात असताना त्यांना दिघी येथे एम एच १४ एम ई ६७९७ हा क्रमांक असलेली एक लाल रंगाची ट्रॅव्हल्स दिसली. तोच क्रमांक भिसे याच्या ट्रॅव्हल्सला असल्याने दोन्ही पैकी एक ट्रॅव्हल्सचा क्रमांक बनावट असल्याची शंका आली. त्यानंतर वाहतुक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक माने यांनी रवी दर्शन येथे येऊन या ट्रॅव्हल्सवर अवैधरित्या प्रवासी वाहतूक केल्याबाबत कारवाई केली होती. या क्रमांकाची माहिती घेतली असता दिघी येथे दिसून आलेल्या ट्रॅव्हल्सचा क्रमांक हा खरा असून त्याचे मालक पिंपळे गुरव येथे असल्याचे आर टी ओच्या अ‍ॅपवरुन समजले.

त्यानंतर काही दिवसानंतर किरण भिसे याने त्याचे ट्रॅव्हल्सला एम एच १२ वाय क्यु ६१०० हा नवीन क्रमांक लावला होता. हा क्रमांक ४ डिसेंबर २०२५ रोजी आर टी ओ येथे नोंदणी असल्याची माहिती त्यांना परिवहन अ‍ॅपद्वारे मिळाली. किरण भिसे हा त्याची ट्रॅव्हल्स नोंदणी होण्यापूर्वीच बनावट क्रमांक वापरुन अवैधरित्या प्रवासी वाहतूक करीत होता. त्यामुळे शासनाची दिशाभूल करण्याचे उद्देशाने किरण भिसे याने त्याच्या पांढर्‍या रंगाच्या ट्रॅव्हल्सची प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नोंद न करता दुसर्‍या ट्रॅव्हल्सचा क्रमांक वापरुन आरटीओ व शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक राघवेंद्र सलगर तपास करीत आहेत.

You may have missed