Pune ACB Trap Case | जमिनीवरील वन क्षेत्राचे शेरे काढून टाकण्यासाठी 7 लाखांची लाच घेताना वन सर्व्हेक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक
पुणे : Pune ACB Trap Case | खासगी जमिनीच्या ७/१२ उतार्यावरील वन क्षेत्राचे शेरे काढून टाकण्यासाठी एजंटकडून ४ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वन विभागातील वन सव्हेक्षक याला सापळा रचून रंगेहाथ पकडले.
उदयसिंग भीमराव कुंभार Udaysingh Bhimrao Kumbhar (वय ४६, सध्या रा. कात्रज, मूळ रा. सातारा) असे या वन विभागातील सर्व्हेक्षक नाव आहे. या प्रकरणी कुंभार याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे जमीन खरेदी-विक्री व्यवसाय करतात. वडगाव मावळ तालुक्यातील चिखलसेगाव, आपटी, कुणेनामा या गावात तक्रारदाराने जमीन खरेदी केली आहे. काही जमिनींच्या सातबारा उतार्यावर खासगी वनाचे शेरे लागले होते. हे शेरे काढून टाकण्यासाठी त्यांनी ११ रिस्टोर्ड ऑर्डर्स महसूल विभागाकडून मिळवून त्या बाबतच्या नोेंदी वन विभागाच्या कागदपत्रांवर घेण्यासाठी अर्ज दिला होता.
या बाबतची प्रत मिळविण्यासाठी त्यांनी सेनापती बापट रस्त्यावरील उपवनसंरक्षक कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जाच्या चौकशीसाठी ते ४ मार्च रोजी वन विभागाच्या कार्यालयात गेले. हे काम वन क्षेत्र सर्व्हेक्षक उदयसिंग कुंभार यांच्याकडे असल्याची माहिती त्यांना मिळाली. कुंभार यांनी ११ आदेशांपैकी (रिस्टोर्ड ऑर्डर) ७ आदेशांच्या प्रती कार्यालयात आहेत. त्यासाठी ७ लाख रुपयांची लाच कुंभार यांनी तक्रारदाराकडे मागितली. याची तक्रार १३ मार्च रोजी त्यांनी लाच लुचपत प्रतिबधक विभागाकडे केली़ त्याची पडताळणी केली असता कुंभार याने तडजोडीत ४ लाख रुपये देण्याचे मान्य केले़ त्यानंतर अरण्येश्वर येथील पुना प्रिर्व्हेटिव्ह कार्डियालॉजी सेंटरसमोर रविवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला. तक्रारदाराकडून ४ लाख रुपयांची लाच घेताना कुंभार याला पकडले.
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सतीश वाळके आणि पथकाने केली आहे़ पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.
