Pune Crime News | अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन खंडणी विरोधी पथकाने जप्त केले देशी बनावटीचे पिस्तुल; अल्पवयीन मुलाने दिले होते ठेवायला
पुणे : Pune Crime News | देशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल बाळगणार्या एका अल्पवयीन मुलाला खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल, तसेच एक काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल परिसरात करण्यात आली. त्याला एका अल्पवयीन मित्राने हे पिस्तुल ठेवायला दिले होते.
दांडेकर पूल परिसरात खंडणी विरोधी पथकातील अधिकारी गस्त घालत होते. त्या वेळी एक अल्पवयीन मुलगा दांडेकर पूल परिसरात थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे ४० हजार ५०० रुपयांचे देशी पिस्तुल व एक काडतुस मिळाले.
१७ वर्षाचा हा मुलगा शिक्षण घेत आहेत. त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्याला एका अल्पवयीन मुलाने ठेवायला दिले होते. या मुलालाही पोलिसांनी आरोपी केले आहे. पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, अमोल राऊत, आझाद पाटील, शेखर खराडे, चेतन आपटे, किरण पड्याळ यांनी केली.
