Anjali Damania | ‘तेव्हा पाय पुसायला नाशिकला जायच्या, आता…’; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
नाशिक : Anjali Damania | राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यातील वाद आता विकोपाला गेला असून, अशोक खरात प्रकरणामुळे या वादाला नवे तोंड फुटले आहे. नाशिकमधील गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भात गाजत असलेल्या या प्रकरणात रूपाली चाकणकर एसआयटी चौकशीला सामोरे का जात नाहीत, असा थेट सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. या घडामोडींमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ माजली असून, चाकणकर यांच्या भूमिकेवर दमानिया यांनी गंभीर ताशेरे ओढले आहेत.
अंजली दमानिया यांनी आरोप केला आहे की, अशोक खरात यांच्याशी संबंधित प्रकरणात अनेक गंभीर बाबी समोर आल्या असतानाही, चाकणकर यांच्याकडून अपेक्षित तत्परता दाखवली जात नाहीये. विशेषतः जेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली, तेव्हा रूपाली चाकणकर यांनी त्या चौकशीला सहकार्य करणे अपेक्षित होते. मात्र, चाकणकर यांनी या चौकशीकडे पाठ फिरवल्याचा दावा दमानिया यांनी केला असून, “जर तुमचे हात स्वच्छ असतील तर चौकशीला घाबरता कशाला?” असा बोचरा वार त्यांनी केला आहे. नाशिक दौऱ्यावर असताना दमानिया यांनी ही भूमिका मांडल्याने स्थानिक राजकारणही तापले आहे.
रुपाली चाकणकर या चौकशीसाठी एसआयटीसमोर जाणार नाहीत, अशी माहिती मला मिळाली. त्यांनी दिलेले कारणही क्षुल्लक होते. ‘मी महिला आहे. मला प्रवास करायला त्रास होईल,’ असे त्यांनी सांगितले. पण यापूर्वी आपण रुपाली चाकणकर यांना अनेकदा नाशिकला जाताना पाहिले आहे. तिकडे जाऊन अशोक खरातचे पाय पदराने पुसताना, केक खाताना रुपाली चाकणकर यांना पाहिले आहे. मात्र, आता त्यांनी एसआयटी चौकशीला नकार दिला आहे. मी महिला आहे आणि प्रवासात वेळ जात असल्याने नाशिकला येता येणार नाही, असे अजब कारण त्यांनी दिले आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
पुढे त्या म्हणाल्या, एसआयटीने पहिले समन्स पाठवून त्या आल्या नाहीत. आता एसआयटीने त्यांना दुसरे समन्स पाठवावे. त्यानंतरही रुपाली चाकणकर चौकशीसाठी आल्या नाहीत तर एसआयटीला कोर्टाकडून आदेश घ्यावे लागतील. पहिले चाकणकर यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट घ्यावे लागले. त्यानंतर अजामीनपात्र वॉरंट घेऊन रुपाली चाकणकर यांना अटक करावी लागेल. त्यामुळे आता बघू रुपाली चाकणकर यांना कधी बुद्धी येते आणि त्या कधी एसआयटीपुढे जातायत? पण त्या आज चौकशीसाठी गेल्या नाहीत यावरुन बरंच काही कळून येते, असेही दमानिया यांनी म्हटले आहे.
