Ready Reckoner Rates | रेडी रेकनर दर ‘जैसे थे’; नवीन आर्थिक वर्षात घरखरेदीदारांना दिलासा, बांधकाम क्षेत्राला बूस्ट

Ready Reckoner Rates | Ready Reckoner Rates 'as they were'; Relief for homebuyers in the new financial year, boost for the construction sector

मुंबई :  Ready Reckoner Rates | राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय घेत महायुती सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनर दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून लागू होणारे दर मागील वर्षाप्रमाणेच कायम राहणार असून, घरखरेदीदार आणि बांधकाम व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे.

गेल्या काही वर्षांत रेडी रेकनर दरात सातत्याने वाढ होत असल्याने मालमत्ता खरेदीचा खर्च वाढत होता. मात्र यंदा दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. यामुळे घर खरेदी करू इच्छिणाऱ्या मध्यमवर्गीयांना विशेष दिलासा मिळणार आहे.

दर स्थिर ठेवण्यामागे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देणे हा महत्त्वाचा उद्देश असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वाढत्या बांधकाम खर्च, व्याजदर आणि बाजारातील मंदावलेली मागणी लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, रेडी रेकनर दरात वाढ न करता वार्षिक मूल्यदर तक्त्यांमध्ये काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. नवीन विकास आराखडे, सर्व्हे क्रमांक अद्ययावत करणे आणि काही नोंदींमध्ये दुरुस्ती यामुळे व्यवहार प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वास्तववादी होणार आहे.

या निर्णयाचा सकारात्मक परिणाम बाजारावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून घर खरेदीचा खर्च नियंत्रणात राहिल्याने व्यवहारांना गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. परिणामी बांधकाम क्षेत्रालाही चालना मिळून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.

You may have missed