Nashik Accident | नाशिकमध्ये भीषण अपघात: दिंडोरीत कार विहिरीत कोसळून 6 विद्यार्थ्यांसह 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू
नाशिक : Nashik Accident | नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली असून, एका भीषण अपघातात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भरधाव वेगातील कार अनियंत्रित होऊन थेट रस्त्याशेजारील खोल विहिरीत कोसळल्याने हा मोठा अनर्थ घडला. या अपघाताचे गांभीर्य अधिक आहे कारण मृतांमध्ये सहा शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यांच्या निधनाने संपूर्ण नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी कारने जात असताना ओझर-खेडगाव रस्त्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार संरक्षक भिंत नसलेल्या विहिरीत कोसळली. विहीर पाण्याने तुडुंब भरलेली असल्याने आतील कोणालाही बाहेर पडता आले नाही आणि गुदमरून सर्वांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र पाण्याचा अंदाज येत नसल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. इंदोरे गावचे सुनिल दरगुडे कुटुंब आणि त्यांच्या नात्यातील अशा एकूण ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका खासगी क्लासचा स्नेहसंमेलन कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना ही घटना घडली
नंतर प्रशासनाने क्रेनच्या साहाय्याने विहिरीतून कार बाहेर काढली, तेव्हा नऊ जणांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. एकाच गावातील इतक्या मोठ्या संख्येने लोक आणि विशेषतः तरुण विद्यार्थी अपघातात दगावल्याने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.
