Amravati News | तरुणींची फसवणूक करणाऱ्या मोहम्मद अयानवर कठोर कारवाई करा; अमरावतीतील मुस्लीम तरुणांची मागणी

Pune Crime News

अमरावती :  Amravati News | शहरात सध्या एका तरुणाने अनेक तरुणींची फसवणूक केल्याच्या प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली आहे. मोहम्मद अयान नावाच्या एका तरुणाने अनेक तरुणींशी लैंगिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप समोर आला आहे. मात्र, या प्रकरणाला जातीय वळण मिळण्यापूर्वीच समाजातील सुजाण मुस्लीम तरुणांनी स्वतः पुढाकार घेत एक आदर्श उदाहरण समोर ठेवले आहे.

या घटनेची माहिती मिळताच अमरावतीतील मुस्लीम तरुणांच्या एका मोठ्या गटाने थेट पोलीस आयुक्त कार्यालय गाठले. संबधित आरोपी मोहम्मद अयान याने जे कृत्य केले आहे, ते अत्यंत निषेधार्ह असून, त्याच्यामुळे संपूर्ण समाजाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना या तरुणांनी व्यक्त केली. त्यांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या प्रकरणात कोणत्याही प्रकारची गय न करता आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

मुस्लीम तरुणांच्या या भूमिकेमागे सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचा मुख्य उद्देश आहे. “एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक चुकीच्या कृत्यामुळे संपूर्ण धर्माला किंवा समाजाला जबाबदार धरले जाऊ नये. गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो आणि त्याला कडक शासन व्हायलाच हवे,” अशी ठाम भूमिका या शिष्टमंडळाने मांडली. अशा प्रकारच्या घटनांमुळे शहरात जातीय तणाव निर्माण होऊ शकतो, जो शांततेसाठी घातक आहे, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, अयान मोहम्मद तन्वीर याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला ७ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, तरुणींच्या लैंगिक अत्याचार प्रकरण आणखी एक आरोपीला अटक केली आहे. हुजर खान इकबाल खान (वय २०) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात आतापर्यंत १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणात फिर्यादी संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आरोपींवर दाखल गुन्ह्यांच्या संख्येमध्ये देखील वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

You may have missed