Sahar Shaikh | कैसा हराया…सहर शेख यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्राचा आरोप; पद रद्द होण्याची टांगती तलवार?

Sahar Shaikh | How to defeat...Sahar Shaikh accused of fake caste certificate; Is the sword hanging over the cancellation of the post?

ठाणे :  Sahar Shaikh | मुंब्रा परिसरात एमआयएम (AIMIM) पक्षाचा तरुण चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरसेविका सहर शेख सध्या मोठ्या कायदेशीर कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत. त्यांनी महापालिका निवडणुकीदरम्यान सादर केलेले जात प्रमाणपत्र हे बनावट असल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे मुंब्रा परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर आता टांगती तलवार निर्माण झाली आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, सहर शेख यांनी ही निवडणूक राखीव प्रवर्गातून लढवली होती आणि त्यात त्यांनी विजयही मिळवला होता. मात्र, तक्रारदाराने पुराव्यासह असा दावा केला आहे की, सहर शेख यांनी आपली खरी जात लपवून आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करून मागासवर्गीय प्रवर्गाचा खोटा दाखला मिळवला आहे. या तक्रारीत केवळ जात प्रमाणपत्रावरच बोट ठेवले नसून, त्या प्रमाणपत्रासाठी सादर केलेली वंशावळ आणि इतर जुने दाखलेही संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.

ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्दिकी अहमद यांनी सहर शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती. युनूस यांनी स्थलांतरितांना नमुना १० लागू असताना नमुना ८ वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल  करत बनावट दाखला मिळवला. त्या आधारे सहरने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून चौकशीची मागणी सिद्धीकी अहमद यांनी केली आहे.

हे प्रकरण आता प्रशासकीय पातळीवर गंभीर वळण घेत आहे. जर जात पडताळणी समितीच्या चौकशीत हे प्रमाणपत्र अवैध किंवा बनावट असल्याचे सिद्ध झाले, तर सहर शेख यांचे नगरसेवक पद रद्द होऊ शकते. मुंब्र्यात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत एमआयएमने आपले पाय रोवले होते, त्यामुळे या कायदेशीर लढाईकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, सहर शेख यांच्या समर्थकांकडून हे सर्व आरोप फेटाळून लावले जात आहेत. हा केवळ राजकीय आकसापोटी केलेला प्रयत्न असून, न्यायालयात आणि समितीसमोर सर्व कागदपत्रे वैध ठरतील, असा विश्वास त्यांच्या गटाकडून व्यक्त केला जात आहे.

You may have missed