Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात सूर्याचा प्रकोप! 15 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’; विदर्भात पारा ४४ अंशांवर
पुणे/मुंबई : Maharashtra Weather Alert | राज्यात सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून, नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील १५ जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. विशेषतः अकोला, अमरावती आणि वर्धा या भागात उष्णतेची तीव्र लाट असून, अकोल्यात तर तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे.
केवळ विदर्भच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी यांसारख्या जिल्ह्यांमध्येही तापमान ४० अंशांच्या वर स्थिरावले आहे. यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून, दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत. वाढत्या उष्म्याचा विचार करून वर्धा जिल्ह्यासह काही भागांतील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे, मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर तापमानाचा आकडा विदर्भाच्या तुलनेत कमी असला, तरी हवेतील आर्द्रतेमुळे नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात उष्ण आणि दमट हवामानामुळे घामाच्या धारा वाहत असून, ‘डिहायड्रेशन’चा धोका वाढला आहे. हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, पुढील ७२ तास हे अधिक कडक उन्हाचे असतील.
या परिस्थितीत नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत काम नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. भरपूर पाणी पिणे, सुती कपडे वापरणे आणि आहारात द्रव पदार्थांचा समावेश करणे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. थोडा दिलासा देणारी बाब म्हणजे, येत्या १९ एप्रिलपासून राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, त्यानंतरच तापमानाचा पारा किंचित खाली येण्याची अपेक्षा आहे.
