Pune Crime Court News | पुणे : लक्ष्मी आंदेकरचा जामीन फेटाळला; सोनाली आंदेकरसह शिवमचा मुक्कामही कोठडीतच
पुणे : Pune Crime Court News | आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर हिचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. याचबरोबर गणेश पेठेतील मासळी बाजारातील व्यापाऱ्यांकडून ‘प्रोटेक्शन मनी’च्या नावाखाली २० कोटी रुपयांहून अधिक खंडणी उकळल्याच्या प्रकरणात आरोपी सोनाली आंदेकर, शिवम आंदेकर आणि सागर थोपटे यांचाही जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. कंठाळे यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला.
माहितीनुसार, पाच सप्टेंबर २०२५ रोजी आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी आंदेकर टोळीच्या गुन्हेगारी कारवायांचा तपास सुरू केला. तपासादरम्यान गणेश पेठेतील मासळी बाजारातील व्यापाऱ्यांकडून संघटितपणे २० कोटी रुपयांहून अधिक खंडणी उकळल्याचे उघड झाले. या प्रकरणात बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, सागर थोपटे यांसह १२ जणांविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी बाजूने अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी लक्ष्मी आंदेकरच्या जामीनास विरोध केला, तर खंडणी प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील विलास पटारे यांनी सोनाली आंदेकर, शिवम आंदेकर आणि सागर थोपटे यांच्या जामीनास विरोध दर्शवला. सरकारी वकिलांचे युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले.
न्यायालयात मांडण्यात आलेल्या युक्तिवादानुसार, लक्ष्मी आंदेकर ही गुन्हेगारी टोळीची सक्रिय सदस्य असून तिचा गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे साक्षीदारांच्या जबाबातून स्पष्ट होते. गुन्ह्यानंतर ती फरार झाली होती आणि तिला गुजरातमधून अटक करण्यात आली. आरोपींना जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता असल्याने जामीन नाकारावा, अशी भूमिका सरकारी पक्षाने मांडली, जी न्यायालयाने मान्य केली.
