Pune Water Supply | पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद

Pune Water Supply | Pune city water supply will be closed on Thursday

पुणे : Pune Water Supply |  शहरातील विविध जलकेंद्रांमध्ये तातडीच्या विद्युत व स्थापत्य दुरुस्तीच्या कामांमुळे येत्या गुरुवारी (२३ एप्रिल) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहील. तसेच शुक्रवारी (२४ एप्रिल) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याची माहिती पाणीपुरवठा विभाग प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली आहे.

महापालिकेकडून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा किंवा दिवसाआड पाणी देण्याचा प्रस्तावही तयार होत असून, भविष्यात नियमितपणे आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. याआधीही एक दिवस पाणी बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र टँकर चालकांच्या संपामुळे तो निर्णय मागे घेण्यात आला होता.

दरम्यान, एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी राज्य सरकारने सूचना दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांना पुढील काही महिन्यांसाठी १५ टक्के पाणीकपातीची नोटीस दिली आहे. त्यामुळे सध्याची पाणीबंदी ही केवळ दुरुस्तीमुळे आहे की अप्रत्यक्ष पाणीकपातीची सुरुवात, यावर शहरात चर्चा सुरू आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारे प्रमुख भाग

मध्यवर्ती पेठा: गुरुवार पेठ, बुधवार पेठ, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, सोमवार पेठ, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर

पर्वती व परिसर: सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर, अप्पर व लोअर इंदिरानगर, स्वारगेट, पर्वती गावठाण

सिंहगड रस्ता व कात्रज: हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, येवलेवाडी

कोथरूड व वारजे: कोथरूड, बावधन, पाषाण, सुतारवाडी, शिवणे, वारजे माळवाडी, कर्वेनगर, डहाणूकर कॉलनी, आयडियल कॉलनी, गुजरात कॉलनी

नगर रोड व हडपसर: खराडी, चंदननगर, येरवडा, लोहगाव, वाघोली, हडपसर गावठाण, सासवड रोड, महंमदवाडी, फुरसुंगी, उरुळी देवाची

शिवाजीनगर व औंध: मॉडेल कॉलनी, भोसलेनगर, सेनापती बापट रोड, गोखलेनगर, औंध, बोपोडी, खडकी, पुणे विद्यापीठ परिसर

नव्याने समाविष्ट गावे: खडकवासला, नांदोशी, सणसनगर, किरकटवाडी, धायरी, नन्हे – बूस्टर पंपिंग अंतर्गत येणाऱ्या भागांमध्येही पाणीपुरवठा खंडित राहील.

You may have missed