Pune Crime News | पुणे हादरलं! प्रेमसंबंधातून वकिल असलेल्या भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीनं केला पतीच्या सेक्रेटरीचा खून

Pune Crime News | Pune shocked! BJP office bearer's wife kills husband's secretary over love affair

पुणे : Pune Crime News | वकिलाबरोबर असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयावरुन वकिलाची पत्नी आणि अल्पवयीन मुलीने त्याच्या सेक्रेटरीचे पाय बांधून तिच्यावर बॅटने व धारदार शस्त्राने वार करुन तिचा खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

आपल्या पत्नी व मुलीने सेक्रेटरीचा खुन केल्याची माहिती या वकिलाला असल्याने या कटात त्याचाही सहभाग असल्याचे दिसून आल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे. अ‍ॅड़ संजय सावंत हा भाजपच्या विधी शाखेचा अध्यक्ष आहे.

पुनम दिनेश मुन (वय३५) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. स्वाती संजय सावंत Swati Sanjay Sawant (वय ४३) अ‍ॅड. संजय दत्तात्रय सावंत Adv. Sanjay Dattatreya Sawant (वय ४३, दोघे रा. आनंदपार्क, वडगाव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत दिनेश उद्धवराव मुन (वय ३९, रा. गणेशनगर, येरवडा) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सावंत हे वकिल असून त्यांचे चंदननगर येथील जुना मुंढवा रोड वरील संदीप हॉटेलजवळ एका गाळ्यामध्ये कार्यालय आहे. पुनम मुन ही गेली ३ वर्षे त्यांची सेक्रेटरी म्हणून काम करत होती. तिचे आणि अ‍ॅड. संजय सावंत यांचे प्रेमसंबंध असल्याचा त्यांची पत्नी व मुलीला संशय होता. पुनम मुन ही १६ एप्रिल रोजी दुपारी कार्यालयात गेली. ती रात्री परत न आल्याने तिचे पती दिनेश मुन हे तिला शोधण्यासाठी १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कार्यालयात गेले तेथे पुनम हिचा मृतदेह एका पोत्यात अर्धवट भरलेला दिसून आला. कार्यालयात रक्त पडलेले दिसून आले. त्यांनी तातडीने चंदननगर पोलिसांना कळविले.

पोलिसांनी केलेल्या तपासात पुनम हिचा खुन स्वाती सावंत व अल्पवयीन मुलीने कट रचून केल्याचे निष्पन्न झाले. अ‍ॅड. संजय सावंत याचे पुनम हिच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचा स्वाती सावंत यांना संशय होता. यावरुन त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. १६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता पुनम मुन ही कार्यालयात असताना स्वाती सावंत व त्यांची मुलगी कार्यालयात आल्या. त्यांनी पुनम हिचे दोरीने पाय बांधले. तिच्या डोक्यात, तोंडावर बॅटने मारहाण केली. तिच्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करुन तिचा निर्घुण खुन केला. तिचा मृतदेह पोत्यात भरण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती अ‍ॅड. संजय सावंत यांना माहित झाली़ तरी तो पोलिसांना काहीही न कळविता मुंबईला निघून गेला. दरम्यान, स्वाती सावंत आणि तिची मुलगी हे ही फरार झाले. चंदननगर पोलिसांनी तांत्रिक दृष्टा तपास करुन अ‍ॅड. संजय सावंत व त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले. खंडणी विरोधी पथकाने स्वाती सावंत यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर ६ तासाच्या आत आरोपींना जेरबंद करण्यात आले. सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार अधिक तपास करीत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, नूतन पवार, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख, तसेच पोलीस निरीक्षक राम राजमाने व त्यांच्याकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

You may have missed