Someshwar Foundation | सोमेश्वर फाऊंडेशन व मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे लमाणतांडा येथे नवे केंद्र सुरू; वस्तीपातळीवर व्यसनमुक्तीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल
पुणे : Someshwar Foundation | सोमेश्वर फाऊंडेशन आणि मनोदय व्यसनमुक्ती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पाषाण रोडवरील लमाणतांडा येथे नव्या व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन उत्साहात पार पडले. हा कार्यक्रम मा. नगरसेवक सनीदादा निम्हण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सामाजिक कार्यकर्ते लहु खेतावत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
गेल्या सात वर्षांपासून मनोदय व्यसनमुक्ती संस्था वस्तीपातळीवर कार्यरत असून, विशेषतः किशोरवयीन मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम राबवत आहे. सोमेश्वर फाऊंडेशनच्या सहकार्यामुळे आता हे कार्य लमाणतांडा परिसरातही विस्तारले आहे.
सोमेश्वर फाऊंडेशन ही संस्था देखील गेली अनेक वर्षांपासून व्यसनमुक्ती आणि जनजागृतीसाठी सातत्याने कार्यरत आहे. वेळोवेळी मॅरेथॉनचे आयोजन करून समाजात व्यसनमुक्तीचा संदेश दिला जातो. अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यासाठी पथनाट्यांचे सादरीकरण तसेच योग शिबिरांचे आयोजनही संस्थेतर्फे केले जाते. तसेच शैक्षणिक स्पर्धा, आरोग्य, संस्कृती आणि रोजगार या विविध क्षेत्रांत संस्था सक्रिय आहे. विशेषतः पाषाण–सोमेश्वर परिसरातील गरजू विद्यार्थी, महिला आणि युवकांसाठी रोजगारनिर्मिती व कौशल्यविकासासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असून ‘पुणे आयडल’सारख्या सांस्कृतिक उपक्रमांमधूनही आपला ठसा उमटवत आहे.तसेच मनोदय व्यसनमुक्ती संस्था गेल्या सात वर्षांपासून वस्तीपातळीवर कार्यरत असून, विशेषतः पौगंडावस्थेतील मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे.
या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने स्क्रीन व्यसन व इतर व्यसनांवर सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून अनेक नागरिकांनी व्यसनमुक्त होण्याची तयारी दर्शविल्याने संस्थेच्या कार्याला नवी दिशा मिळाली आहे.
कार्यक्रमादरम्यान सनी निम्हण यांनी उपस्थित किशोरवयीन मुलांशी संवाद साधत शिस्त, शिक्षण आणि योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले. “उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण आणि योग्य सवयी आवश्यक आहेत,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
या उपक्रमासाठी सातत्याने सहकार्य आणि सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सोमेश्वर फाऊंडेशन तसेच सनी निम्हण यांचे मनोदय व्यसनमुक्ती संस्थेतर्फे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाला मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. विष्णू श्रीमंगले यांच्यासह मैत्रेयी पाध्ये, सूरज शिंदे, सुदर्शन वढाराव आणि इतर टीम सदस्य उपस्थित होते.
