Pune PMC News | 40 कोटींची महापालिकेची जागा 500 रुपयांच्या बाँडवर? नगरसेवक अमोल बालवडकर यांचा सर्वसाधारण सभेत आरोप (Video)

Pune PMC News | 40 crore municipal land on a bond of 500 rupees? Corporator Amol Balwadkar's allegations in the general meeting (Video)

पुणे : Pune PMC News | महापालिकेच्या मालकीची सुमारे ४० कोटी रुपयांची जागा केवळ ५०० रुपयांच्या बाँडपेपरवर एका संस्थेला देण्यात आल्याचा गंभीर आरोप सर्वसाधारण सभेत करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी हा मुद्दा उपस्थित करत, संबंधित संस्थेकडून बाणेर येथे चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयात महापालिकेला एकही मोफत बेड मिळत नसल्याचे सांगितले.

https://www.instagram.com/p/DXbyjvtjAzg

या रुग्णालयात एका सफाई कर्मचाऱ्याच्या एक महिन्याच्या मुलीवर उपचार सुरू असून, महात्मा फुले आरोग्य योजनेची कागदपत्रे देऊनही संपूर्ण बिल भरण्याची मागणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना या सुविधांचा प्रत्यक्ष लाभ होत नसल्याची बाब समोर आली.

महापालिकेची मालमत्ता कोणत्या नियमांनुसार या संस्थेला देण्यात आली, याबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. यावर इतर नगरसेवकांनीही शहरातील रुग्णालयांमध्ये विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, आरोग्य विभागाकडून या तक्रारींची दखल घेत संबंधित नगरसेवकांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच, रुग्णालयांमधील बेड उपलब्धतेसाठी डॅशबोर्ड तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

महापौरांनी या सर्व प्रकरणाचा सविस्तर अहवाल सभागृहासमोर मांडण्याचे आदेश दिले असून, शहरातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांची माहिती नागरिकांना सहज मिळावी यासाठी मोबाइल अॅप विकसित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

You may have missed