Baramati By-Election | अजितदादांच्या निधनानंतर पहिलीच निवडणूक; सुनेत्रा पवारांना दाटून आला हुंदका, बारामतीकरही भावूक!
बारामती : Baramati By-Election | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आपल्या पतीच्या आठवणींनी आणि कौटुंबिक संघर्षाचा उल्लेख करताना त्यांना अश्रू अनावर झाले.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापासूनच सुनेत्रा पवार अत्यंत भावूक झाल्या होत्या. “अजितदादा बारामतीचा श्वास होते आणि त्यांनी याच मातीत अखेरचा श्वास घेतला,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “दादांशिवाय ही पहिलीच निवडणूक आहे. त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून, ते काळजाच्या तळघरात कोंडून आज मैदानात उतरले आहे,” असे त्या म्हणाल्या.
यावेळी सुनेत्रा पवार यांना आज बारामतीच्या मतदानसाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सुनेत्रा पवार भावूक झाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, आपल्याला दादांशिवाय कोणतीही गोष्ट करायची आपल्याला सवय नाही. पण आपल्याला हे मान्य केलं पाहिजे की, दादा आपल्यात आज नाहीत, असे सांगत सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.
