Jay Ajit Pawar | बारामतीत 2029 साठी जय पवारांच्या उमेदवारीची चर्चा; मतदानादरम्यान विधान
पुणे : Jay Ajit Pawar | बारामती मतदारसंघातून २०२९ मध्ये आपण उमेदवार असावे, अशी स्थानिकांची इच्छा असल्याचे जय अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आज बारामतीत पोटनिवडणुकीसाठी सकाळपासून उत्साहात मतदान सुरू असून, मतदानाचा हक्क बजावल्यानंतर जय पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.
जय पवार म्हणाले की, “लोकांची अपेक्षा आहे की मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहावे आणि २०२९ मध्ये बारामतीतून उमेदवार व्हावे.” तसेच, अजित पवार यांच्या अपघाताबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या घटनेचा तपास सुरू असून अंतिम अहवाल येण्यासाठी सुमारे एक वर्ष लागू शकते. तपास जलदगतीने व्हावा, यासाठी विविध यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अपघाताबाबत सत्य स्पष्ट होईपर्यंत कोणतीही दिशाभूल न करता संयम राखण्याचे आवाहन त्यांनी केले. सीआयडीसह संबंधित यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत असून, मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी खासदार पार्थ अजित पवार आणि जय अजित पवार यांनीही मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला.
तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबासह मतदान करत नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. “कर्तव्य बजावण्यासाठी आणि दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.
