PCMC News | बोगस उपसूचना घोटाळा 60 कोटींवर; 243 पानी अहवाल आयुक्तांकडे सादर
पिंपरी : PCMC News | महापालिकेतील उपसूचना घोटाळा तब्बल ६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले असून, चौकशी समितीच्या २४३ पानी अहवालात १४ उपसूचना बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आला असला तरी, कारवाईपेक्षा दोषींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी स्थायी समितीला दिलेल्या पत्रात बोगस उपसूचनांची कबुली दिली असली, तरी पुढील निर्णयासाठी १० दिवसांची मुदत मागितल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणात एका आमदाराच्या हस्तक्षेपाच्या चर्चेमुळे चौकशी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौकशी समितीचे तत्कालीन अध्यक्ष विजयकुमार खोराटे यांच्यासोबतची बैठक, तसेच अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि संबंधित अधिकाऱ्यांना खासगी ठिकाणी बोलावल्याच्या चर्चेमुळे प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.
अहवालात सागर पवार, सचिन राणे, योगेश पवार, अरुण गुंडगळ आणि राजेश चव्हाण या कर्मचाऱ्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. मात्र मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांचे नाव नसल्याने चौकशी सर्वंकष होणार का, की केवळ खालच्या स्तरावरच मर्यादित राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या घोटाळ्यात कंत्राटदारांची ६० कोटी रुपयांची देयके काढण्यासाठी बोगस उपसूचना वापरल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि या मागील सूत्रधारांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी विरोधी नगरसेवकांकडून करण्यात येत आहे.
स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी या प्रकरणाला अत्यंत गंभीर संबोधत सविस्तर अहवाल १० दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तर काही नगरसेवकांनी उपसूचनांच्या प्रक्रियेत त्यांचीही फसवणूक झाल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
