Pune Crime News | शिवसेनेच्या पदाधिकार्‍याचा गेम वाजविण्यासाठी आले अन् त्यांचीच गेम झाली; हॉटेलमध्ये दहशत निर्माण करणार्‍या दोघांना खंडणी विरोधी पथकाने शस्त्रासह केले जेरबंद

Pune Crime News | Shiv Sena office bearers came to play a game and their game was over; Two people who created terror in a hotel were arrested with weapons by the anti-extortion squad

पुणे : Pune Crime News | शिवसेनेचे पदाधिकारी निलेश काळभोर यांचा गेम वाजविण्यासाठी लोणी काळभोर मधील माईल्सस्टोन हॉटेलमध्ये तलवारी, कोयत्यांसह शिरुन दहशत निर्माण करणार्‍या चौघांपैकी दोघांचा खंडणी विरोधी पथकाने शस्त्रासह पकडून त्यांचाच गेम वाजविला आहे.

प्रणवराज सुनिल यादव Pranavraj Sunil Yadav (वय २५, रा. मांजरी बुद्रुक) आणि जय गणेश शेलार Jai Ganesh Shelar (वय २५, रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन लोखंडी तलवारी, दोन लोखंडी सुरे व एक कोयता असा साडेतीन हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

याबाबत हॉटेल मालक सूर्यकांत बापूसाहेब उंद्रे (वय ४०, रा. स्मृती निवास, मांजरी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कदमवाक वस्ती येथील हॉटेल माईलस्टोन ०९ येथे १९ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजता घडली होती. हॉटेल बंद करुन कर्मचारी किचनची साफसफाई करीत होते. त्यावेळी चौघे जण सुरक्षा रक्षकाला धमकावून आत शिरले. त्यावेळी सूर्यकांत उंद्रे व मॅनेजर नितेश हेगडे किचनमध्ये बसले होते. ते किचनमध्ये आले. त्यावेळी त्यांनी निलेशदादा काळभोर आहेत का, आम्हाला त्याला भेटायचे आहे, असे सांगितले. उंद्रे यांनी हॉटेल १२ वाजता बंद झाले. आता हॉटेलमध्ये कोणीच नाही, असे सांगितले. तरी त्यांनी शोधाशोध करीत होते. त्यांनी सर्व हॉटेल चेक केले. मॅनेजरने त्यांना विनंती करुन बाहेर काढले. ते बाहेर जात असताना त्यांच्यापैकी एकाने उद्देशुन ऐ आकाश, पम्या असे नाव घेत होते. त्यांच्यातील एक हातात पिस्टल धरुन सूर्यकांत उंद्रे यांच्याकडे आले. त्यांचे नाव विचारले. त्यांनी नाव सांगून तुमचे काय काम आहे, असे विचारले. तेव्हा त्याने आपले नाव अस्लम अल्ताफ शेख असे सांगून निलेश काळभोर याचा आज गेम वाजवायचा होता, असे सांगून बाहेर उभी असलेल्या कारमध्ये बसून ते निघून गेले. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खंडणी विरोधी पथकाकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत मांजरी परिसरात फिरत होते. पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना त्यांच्या बातमीदाराने बातमी दिली की, माईलस्टोन हॉटेलमध्ये शस्त्रासह शिरलेल्यांपैकी दोघे जण आता मांजरी ग्रीन अ‍ॅनेक्स येथे आहेत. त्यांच्याकडे शस्त्रे आहेत. नितीन मुंढे यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथकाने प्रणवराज यादव व  जय शेलार याला पकडले. त्यांच्याकडून २ लोखंडी तलवारी, दोन सुरे, एक कोयता जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सांगितले की, निलेश काळभोर हे शिवसेनेचे पदाधिकारी आहे. त्यांचा आणि अस्लम शेख व इतरांचा पूर्वीपासून वाद आहे. अस्लम शेख याचा पोलीस शोध घेत आहेत. पकडलेल्या दोघांना बुधवारी सायंकाळी मांजरी पोलिसांकडून  लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, पोलीस हवालदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, घावटे, कुसाळकर, आढारी महाजन, राऊत, शेख, परीट, राक्षे, पोलीस अंमलदार पाटील, खराडे, खरात, शिंदे यांनी केली आहे.

You may have missed