Pune Crime News | पुणे : हडपसरमध्ये दुर्दैवी घटना; घसरगुंडी कोसळून बालिकेचा मृत्यू,  वेदविहार सोसायटीच्या अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | हडपसरमधील मगरपट्टा परिसरात सोसायटीच्या आवारातील लोखंडी घसरगुंडी डोक्यावर पडून एका बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाणे यांनी वेदविहार सोसायटीच्या अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मृत बालिकेचे नाव अनिका नवनाथ देवीकर (वय ४.५ वर्षे) असे असून, तिचे वडील नवनाथ देवीकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना ७ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिका सोसायटीच्या आवारात खेळत असताना लहान मुलांसाठी बसविण्यात आलेली लोखंडी घसरगुंडी तिच्या डोक्यावर कोसळली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित घसरगुंडी योग्य प्रकारे बसविण्यात आलेली नव्हती. ती काढून टाकण्याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर सोसायटी व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साने करत आहेत.

You may have missed