Pune Crime News | मोबाईल चेक करायला घेतल्याचे पाहून पतीने पत्नीला केली बेदम मारहाण; पत्नीची बरगडी झाली फ्रॅक्चर, पोलिसांकडे तक्रार दिल्यास मारुन टाकण्याची दिली धमकी
पुणे : Pune Crime News | मोबाईल फोन आताश्या सर्वांचा जीव की प्राण झाला आहे. प्रत्येकाची त्यात काहीना काही गुपिते साठलेली असतात. त्यामुळे अगदी जवळच्या व्यक्तीलाही अनेक जण आपल्या मोबाईल लॉकचा पासवर्ड सांगत नाहीत. कोणी आपल्या मोबाईलमधील गोष्टी पाहू नये, म्हणून अनेक जण त्यांच्या बँकेचा पासवर्ड नसेल इतका अवघड मोबाईल लॉकचा पासवर्ड ठेवतात. अशात पत्नीने पतीचा मोबाईल चेक करण्यासाठी हातात घेतला. याचा राग येऊन पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. त्यात पत्नीच्या बरगडीला फ्रॅक्चर झाले आहे. लोहगाव पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
शैलेश विष्णुपंत वर्पे (वय ३७, रा. जगदगुरु कॉलनी, योजनानगर, वाघोली रोड, लोहगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. हा प्रकार २१ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता त्यांच्या घरात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश वर्पे यांचा व्यवसाय आहे. बुधवारी दुपारी ते घरी असताना पत्नीने त्यांचा मोबाईल घेऊन त्या चेक करु लागला. याचा शैलेश यांना राग आला. त्यांनी रागाच्या भरात पत्नीला वाईट वाईट शिवीगाळ करुन हाताने, बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्यांच्या छातीच्या डाव्या बाजूची बरगडी फ्रॅक्चर झाली. शैलेश याने पत्नीचे डोक्याचे केस धरुन तिचे डोके भिंतीवर आपटले. पाठीत, खांद्याला व हाताला मारहाण करुन दुखापत केली. तसेच पोलीस तक्रार दिल्यावर मारुन टाकीन, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी बालपांडे तपास करीत आहेत.
