MHADA News | प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर म्हाडाच्या 295 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध
पुणे : MHADA News | म्हाडा अंतर्गत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर २९५ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील गरजू व पात्र नागरिकांसाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सदनिका १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना तसेच २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत आहेत.
पूर्वी काढलेल्या सोडतीनंतर मागणीअभावी रिक्त राहिलेल्या या सदनिकांची विक्री आता ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येणार आहे. विकासकांकडून प्राप्त अहवालाच्या आधारे ही प्रक्रिया राबवली जात आहे.
पारदर्शकता राखण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन ठेवण्यात आली असून इच्छुकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
तसेच, विकासकांकडून सोडतीनंतर विक्री न झालेल्या सदनिका उपलब्ध होताच त्यांची पडताळणी करून त्याच तत्त्वावर गरजू लाभार्थ्यांना वाटप करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू राहणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
