Pune Crime News | पोलीस असल्याची बतावणी करुन नातीला महापालिकेत नोकरीच्या बहाण्याने महिलेला तोतयाने घातला पाच लाखांचा गंडा
पुणे : Pune Crime News | हडपसर पोलीस ठाण्यात पोलीस असल्याचे सांगून नातीला महापालिकेच्या जन्म मृत्यु खात्यात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून एका तोतयाने महिलेला ५ लाख रुपयांना गंडा घातला.
केतन दादासाहेब साळुंखे Ketan Dadasaheb Salunkhe (वय ४०, रा. कुशल वाटिका सोसायटी, लोणी काळभोर) असे या तोतयाचे नाव आहे. याबाबत एका ६० वर्षाच्या महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार खराडीतील कृष्णा हॉटेल येथे २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी महिला व केतन साळुंखे याची सोशल मीडिया फेसबुकवरुन ओळख झाली. केतन साळुंखे याने आपण हडपसर पोलीस ठाणे, युनिट ५ येथे पोलीस असल्याचे सांगितले. कधी कधी मंत्रालयातही असतो. त्याने माझी मोठमोठ्या वरिष्ठ अधिकार्यांची ओळख आहे. मी नोकरी लावण्याचे काम करतो. तुमचे कोणी मुलगा, मुलगी असले तर सांगा त्यांना महापालिकेच्या जन्म मृत्युचे दाखले देतो, त्या विभागात नोकरी लावतो, असे सांगितले. फिर्यादी यांच्या मुलीच्या मुलीला नोकरीची आवश्यकता होती.
२ एप्रिल २०२६ रोजी केतन साळुंखे याने त्यांना फोन करुन पैसे घेऊन खराडी पोलीस ठाण्याच्या बाहेर बोलविले. त्या रिक्षाने तेथे गेल्या. तो त्यांच्या रिक्षात बसला. त्याने दिलेल्या फाईलमध्ये त्यांनी ३ लाख रुपये ठेवले. त्यानंतर त्यांनी ८ एप्रिल रोजी चाकण सहकारी पतसंस्थेत सोन्याचे दागिने गहाण ठेवून २ लाख रुपये घेतले. ते केतन साळुंखे याला पाठविले. त्यानंतर त्याने ससून रुग्णालयात नातीला मेडिकलसाठी घेऊन या, असे सांगितले. त्यानुसार १८ एप्रिल रोजी त्या नातीला घेऊन ससून रुग्णालयात गेल्या. परंतु, केतन साळुंखे आला नाही, त्याचा फोनही बंद लागत होता. त्यांनी हडपसर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट ५ येथे जाऊन चौकशी केली. तेव्हा केतन साळुंखे असा कोणी पोलीस अधिकारी नसल्याचे समजले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक घुले तपास करीत आहेत.
