Pune Crime News | रांका ज्वेलर्सला 18 कोटींचा गंडा घालणार्‍या त्रिकुटाला खंडणी विरोधी पथकाने अहिल्यानगरवरुन केले जेरबंद, 42 वर्षे काम करीत असलेल्या मॅनेजरचे कृत्य

Pune Crime News | Trio who duped Ranka Jewellers of Rs 18 crores arrested by Anti-Extortion Squad from Ahilyanagar, action of manager who has been working for 42 years

पुणे : Pune Crime News | पुण्यातील प्रसिद्ध सराफ रांका ज्वेलर्स यांच्या लक्ष्मी रोडवरील दुकानात तब्बल ४२ वर्षे काम करीत असलेल्या ६१ वर्षाच्या  मॅनेजरने इतरांच्या मदतीने तब्बल १२ हजार ८०० ग्रॅमचे सोन्याचे दागिने व ७२ लाख रुपये असा तब्बल १८ कोटी ७२ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.  खंडणी विरोधी पथकाने अहिल्यानगर येथून  दुकानातील या  मॅनेजरसह तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दागिने, मर्सिडीज बेंझ कार, ३ लाख ३० हजार रुपयांचे मोबाईल, ८० हजार रुपयांची रोकड असा ५ कोटी २४ लाख ८२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

प्रशांत कांतीलाल बर्मेचा Prashant Kantilal of Barmecha (वय ६१, रा. शांतीनगर सोसायटी, कोंढवा), रमाकांत महादेव पराळे Ramakant Mahadev Parale (वय ६२, रा. केडगाव, जि. अहिल्यानगर) आणि मधु ऊर्फ महेश्वरी रमाकांत पराळे Madhu alias Maheshwari Ramakant Parale (वय २२, रा. केडगाव, जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत श्रेयस अशोक रांका (वय ३७, रा. अशोक बंगला, सुजय गार्डन, मुकुंदनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात २३ एप्रिल २०२६ रोजी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ ऑक्टोंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कांतीलाल बर्मेचा हे रांका ज्वेलर्स यांच्याकडे गेल्या ४२ ते ४४ वर्षांपासून कामाला आहेत. १९९२ मध्ये त्यांनी लक्ष्मी रोडला दुकान सुरु केल्याने त्यांची तेथे बदली करण्यात आली. प्रशांत बर्मेचा हे अनुभवाने ज्येष्ठ असल्याने त्यांना कंपनीने मॅनेजर/ रोखपाल (कॅशियर) म्हणून जबाबदारी दिली होती. त्यांच्याकडे कंपनीला सोने पुरवणारे, व्यापारी व ग्राहक यांचे सोबत व्यवहार करीत होता. त्यांचे कामावर विश्वास ठेवुन कंपनीने प्रशांत बर्मेचा यांना सोने पुरवठादार व ग्राहक यांच्याकडून सोन्याचे दागिने खरेदी विक्रीची जबाबदारी दिली होती.

मार्च २०२६ मध्ये वार्षिक ऑडिट कामी स्टॉक व्हेरिफिकेशन करताना सोन्याचे दागिन्यांमध्ये १२ हजार ८०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ७२ लाख रुपयांचा हिशोब लागला नाही. त्याबाबत दुकानात चौकशी केल्यावर दुकानातील प्रशांत कांतीलाल बर्मेचा यांनी चोरी, फसवणूक व विश्वास घात करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम कविता रमाकांत पराळे यांना देऊन फसवणूक केली आहे.

अधिक चौकशीत याबाबतची माहिती फिर्यादी यांना मिळाली. मागील ७ ते ८ महिन्यांपूर्वी कविता रमाकांत पराळे, त्यांची मुलगी मधु व पती रमाकांत पराळे हे दुकानात सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांची प्रशांत बर्मेचा यांच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर ते वारंवार दुकानात खरेदीसाठी येऊ लागले.

प्रशांत बर्मेचा यांनी सोन्याचे दागिन्यांची विक्री न दाखवता जागड (अ‍ॅप्रुव्हल तत्वावर कंपनीचे संचालकांना कळु नये, याकरीता स्वत: परस्पर कम्प्युटरवर नोंदी करुन कविता पराळे यांना दुकानात काही  वेळा  दुकानाचे बाहेर गाडीत दागिने नेऊन देत असत़ त्यांनी १ ऑक्टोंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या दरम्यान १८ कोटी रुपयांचे तब्बल १३९ वेळा एकूण १२ हजार ८०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दिले. तसेच दुकानातील सर्व दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी तिजोरी स्ट्रँगरुम आहे. जानेवारी २०२६ मधील पहिल्या आठवड्यात प्रशांत बर्मेचा यांनी तिजोरीमधील ७२ लाख रुपये काढून पिशवीत भरले. दुकानातील शिपायाच्या हस्ते गल्लीत मर्सिडीज कारमध्ये बसलेल्या कविता पराळे यांच्याजवळ दिले. रांका यांनी २३ एप्रिल रोजी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान आरोपी हे अहिल्यानगरमधील केडगाव येथे असल्याचे समजल्याने खंडणी विरोधी पथक तातडीने अहिल्यानगर येथे रवाना झाले. प्रशांत बर्मेचा हे रमाकांत महादेव पराळे यांच्या रहात्या घरी मिळून आले. प्रशांत बर्मेचा हा गेल्या दीड महिन्यांपासून इतर आरोपींबरोबर त्यांचे घरी रहात होता. पराळे यांची घरझडती घेतली असता घरात ३ कोटी ९० लाख ७२ हजार रुपये किंमतीचे ३ किलो ५५२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ लाख ३० हजार रुपयांचा मोबाईल, १ कोटी ३० लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ कार, ८० हजार रुपये रोख असा ५ कोटी २४ लाख ८२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने, सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी कसोदे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस अंमलदार अनिल कुसाळकर, किरण पड्याळ, अजिनाथ येडे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, आझाद पाटील, गणेश खरात, प्रशांत शिंदे, संतोष विभुते, मयुरी नलावडे, प्रतिक्षा पानसरे, सुवर्णा धुमाळ यांनी केली आहे.

You may have missed