Pune Traffic Police | पुणे : वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने एका तरुणाचा वाचला जीव ! मार्केटयार्ड चौकात ऊन्हामुळे झाला होता त्रास, तातडीने दाखल केले रुग्णालयात
पुणे : Pune Traffic Police | भर दुपारची वेळ, डोक्यावर सूर्य आग ओकत होता. अशा उन्हात मार्केटयार्ड येथील चौकात वाहतूक शाखेचे दोन अंमलदार आपली ड्युटी करीत होते. दुपारी १२ वाजून २० मिनिटे झाली असतील, तेव्हा त्यांचे लक्ष रस्त्याच्या कडेला असलेल्या एका व्यक्तीकडे गेले. तो झाडाखाली बसला असल्याचे दिसत होते.
उन्हामुळे सावलीला थांबला, असे प्रथमदर्शनी पाहणार्याला वाटले असते. पण, हेड कॉन्स्टेबल तानाजी राऊत आणि कॉन्स्टेबल दीपक गाडगे यांना ते नेहमीसारखे वाटले नाही. त्यांनी त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन पाहिले तर, त्यांच्या सर्वांगाला घाम आल्याचे दिसून येत होते. ऊन्हाचा त्रास झाला असेल, असे वाटल्याने त्यांनी त्यांना हलवून विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना काही सुधरत नव्हते. त्यांनी तातडीने रिक्षातून जवळच्या कमला हॉस्पिटलमध्ये नेले. त्यांनी त्यांना राव नर्सिंग होममध्ये नेण्यास सांगितले. या दोन्ही पोलीस अंमलदारांनी त्यांना पुन्हा रिक्षातून राव नर्सिंग होम मध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु केले. वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला.
दत्तात्रय रणधावे (वय ४७, रा. चरोली) असे या रुग्णाचे नाव आहे. दत्तात्रय रणधावे हे काही कामानिमित्त मार्केटयार्ड येथे आले होते. भर दुपारच्या ऊन्हामुळे त्यांची शुगर खुप खाली गेली होती. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सर्वांगाला घाम आला. त्यामुळे तेथेच झाडाखाली बसले होते. दोघा पोलीस अंमलदारांचे त्यांच्याकडे वेळेवर लक्ष गेल्याने त्यांचा प्राण वाचला.
राव नर्सिंग होमचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी सांगितले की, पोलिसांनी दाखविलेली तत्परता व मानवतावादी दृष्टिकोन अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांच्या वेळेवर केलेल्या मदतीमुळे रुग्णाचा जीव वाचला.
पोलीस अंमलदार तानाजी राऊत आणि दीपक गाडगे यांनी दाखविलेल्या समयसुचकता आणि तत्परतेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
