Mumbai Crime News | मुंबईत धक्कादायक घटना! बिर्याणी-कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू; विषबाधेचा संशय
मुंबई: Mumbai Crime News | दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने बिर्याणीची मेजवानी केल्यानंतर गोड पदार्थ म्हणून कलिंगड खाल्ले आणि काही तासांतच त्यांची प्रकृती बिघडू लागली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतरही उपयोग झाला नाही आणि कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
शनिवारी रात्री अब्दुल्ला कादर (४०), त्यांची पत्नी नसरीन (३५) आणि मुली आयेशा (१६) व झैनब (१३) हे नातेवाईकांसोबत मेजवानीसाठी एकत्र आले होते. बिर्याणी खाल्ल्यानंतर ते घरी परतले. रात्री उशिरा त्यांनी कलिंगड खाल्ले. पहाटेच्या सुमारास उलट्या, अतिसार आणि तीव्र अशक्तपणा अशी लक्षणे दिसू लागली. प्रकृती गंभीर झाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान सर्वप्रथम झैनबचा मृत्यू झाला. त्यानंतर आई नसरीन आणि मोठी मुलगी आयेशाही उपचारांना प्रतिसाद देऊ शकल्या नाहीत. रात्री उशिरा कुटुंबप्रमुख अब्दुल्ला यांचाही मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी अब्दुल्ला यांनी दिलेला जबाब पोलिस तपासासाठी महत्त्वाचा ठरत आहे.
डॉक्टरांच्या मते, सर्वांना तीव्र उलट्या आणि अतिसारामुळे निर्जलीकरण झाले होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दूषित किंवा भेसळयुक्त अन्नामुळे अशा प्रकारची विषबाधा होऊ शकते. कलिंगडामध्ये बाह्य पदार्थ मिसळल्यास किंवा जीवाणूंचा संसर्ग झाल्यास धोका वाढतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदन करण्यात आले आहे. घरातून मिळालेल्या अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस यांच्याकडून संयुक्तपणे तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
