Pune Crime Court News | पुणे : महिलेच्या खूनप्रकरणी कामगाराला जन्मठेप; दहा वर्षांनंतर न्यायालयाचा निकाल
पुणे : Pune Crime Court News | पुण्यातील सूस गावात घडलेल्या थरारक खूनप्रकरणी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. किरकोळ वादात मध्यस्थी करणाऱ्या महिलेचा चाकूने खून करणाऱ्या कामगाराला पुणे न्यायालयाने जन्मठेप आणि १८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच या घटनेत शेजारी कुटुंबातील तिघांवर जीवघेणा हल्ला केल्याबद्दलही आरोपीला दोषी ठरवण्यात आले आहे.
मुकिंद शेकू हाते (वय ४१, रा. सूस गाव, मूळ रा. नांदेड) असे दोषीचे नाव आहे. १६ फेब्रुवारी २०१६ रोजी सकाळी सूस गावातील चांदेरे चाळीत ही घटना घडली होती. आरोपीने शेजारी राहणाऱ्या नंदाबाई कांबळे यांच्या पोटात चाकूने वार करून त्यांचा निघृण खून केला होता. त्यांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या तक्रारदारांचे आई-वडील यांच्यावरही त्याने हल्ला केला, ज्यात ते गंभीर जखमी झाले.
घटनेपूर्वी आरोपीने तक्रारदारांच्या कुटुंबाशी वाद घातला होता. त्यावेळी नंदाबाईंनी मध्यस्थी केली होती. त्याचाच राग मनात धरून आरोपीने हा हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
खटल्यादरम्यान आरोपीने स्वतःला मानसिक रुग्ण असल्याचे सांगत बचावाचा प्रयत्न केला, मात्र त्यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. भोसले यांच्या न्यायालयाने आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे मान्य करत कठोर शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकार पक्षाने १४ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षी, तसेच पीडित कुटुंबियांच्या साक्षी निर्णायक ठरल्या. आरोपीने जाणीवपूर्वक पोटासारख्या नाजूक भागावर वार केल्यामुळे त्याचा हेतू स्पष्ट असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
या निर्णयामुळे दहा वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पीडित कुटुंबाला अखेर दिलासा मिळाला असून आरोपीला त्याच्या कृत्याची कठोर शिक्षा मिळाली आहे.
