Sandeep Khardekar | पुणे : कर्वेनगरमधील ‘पाणी एटीएम’मधून दूषित पाणी; तपासणीत अयोग्य ठरले, शहरभर तपासणीची संदीप खर्डेकर यांची मागणी
पुणे : Sandeep Khardekar | कर्वेनगर परिसरात बसविण्यात आलेल्या ‘पाणी एटीएम’मधून मिळणारे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. संबंधित पाण्याची तपासणी केल्यानंतर ते आरोग्यास अपायकारक असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून, शहरातील अशा सर्व पाणी एटीएमची तातडीने तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गुरुवार आणि शुक्रवारी पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असताना, कर्वेनगरमध्ये एका ठिकाणी अवघ्या एक रुपयात एक लिटर पाणी देणारे एटीएम सुरू करण्यात आले होते. परिसरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी राहत असल्याने या स्वस्त पाण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे दिसून आले.
या पाण्याच्या दर्जाबाबत शंका उपस्थित झाल्यानंतर स्थानिकांनी पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानुसार कनिष्ठ अभियंता अपर्णा देसाई यांनी तातडीने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले. अहवालात हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले.
मात्र, तपासणीनंतरही या एटीएममधून पाणी विक्री सुरू असल्याचे आढळून आले. काही विद्यार्थ्यांनी ‘५ रुपयांत १० लिटर पाणी मिळत असल्याने ते दिवसभरासाठी उपयोगी पडते’ असे सांगितले.
या प्रकारामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
* अशा प्रकारे पाणी विक्री करण्यास परवानगी आहे का?
* पाणी अयोग्य असतानाही कोणतीही सूचना न देता विक्री का सुरू आहे?
* शहरात अशा प्रकारचे किती पाणी एटीएम कार्यरत आहेत आणि त्यांना अधिकृत परवानगी आहे का?
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची दखल घेत कठोर कारवाई करावी, अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
