Pune Crime News | पुणे : एकाच घरातील 7 मोबाईल चोरुन नेणार्या सराईत गुन्हेगाराला चंदननगर पोलिसांनी 4 तासात केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | वडगाव शेरी येथील साईनाथ नगरमध्ये राहणार्या कामगारांचे ७ मोबाईल एकाचवेळी चोरुन नेणार्या सराईत गुन्हेगाराला चंदननगर पोलिसांनी अवघ्या ४ तासात जेरबंद केले.
वेदांत गणेश चव्हाण (वय १९, रा. मांजरी) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेले ७ मोबाईल व इतर साहित्य असा ६६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. वेदांत चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चोरीचे तसेच पोक्सोचे गुन्हे दाखल आहेत.
याबाबत फुरकान फरीद खान (वय १९, रा. श्रीराम निवास, साईनाथ नगर, वडगाव शेरी) या भाजी विक्रेत्याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तो व त्याचे साथीदार हे मूळचे उत्तर प्रदेशातील राहणारे आहेत. येथे ते एकत्र राहतात. २६ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा ते २७ एप्रिल सकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराच्या उघड्या दरवाजावाटे आत शिरुन चोरट्यांनी घरातील ७ मोबाईल चोरुन नेले होते.
गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीनी निष्पन्न करुन वेदांत चव्हाण याला अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ४ तासात तो उघडकीस आणला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल धस यांच्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार टी आर लिंगाण्णा, गुरव, डांगे, बेंद्रे व लहाने यांनी केली आहे.
