Pune Crime News | खुनाच्या गुन्ह्यातील गेल्या 6 वर्षापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला खराडी पोलिसांनी केले जेरबंद

Pune Crime News | Kharadi police arrest main accused in murder case who was absconding for the last 6 years

पुणे : Pune Crime News | खराडी येथील लॉजवरुन अपहरण करुन त्याचा खुन करुन मृतदेह नदीच्या पाण्यात फेकून देणार्‍याचा २०१९ मध्ये झालेल्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी गेली ६ वर्ष फरार होता. खराडी पोलिसांना त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.

तेजस अमृत ढेरे Tejas Amrit Dhere (वय ३६, रा. अलका उत्तम बिल्डिंग, दत्त चौक, मुंढवा रोड) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

तेजस ढेरे याने आपल्या साथीदारांसह २०१९ मध्ये राहुल शिवाजी शेलार (वय २४, रा. दातेवाडी, ता. खटाव, जि. सातारा) यांचे खराडी येथील कॉनेंट लॉज येथून अपहरण करुन त्याचा खुन करुन मृतदेह नदीच्या पाण्यात फेकून दिला होता. चंदननगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ७ जणांना अटक केली होती. तेजस ढेरे हा फरार झाला होता.

तेजस ढेरे याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये खुनाचा प्रयत्न, शिरुर पोलीस ठाण्यात दरोडा, मुंढवा पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट खाली गुन्हे दाखल आहेत. तेजस ढेरे हा गेल्या ६ वर्षापासून फरार आहे. खराडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे, अशोक केदार यांना २५ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता तेजस ढेरे हा खराडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना त्याबाबत माहिती दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संतोष म्हेत्रे व इतरांना खराडीतील उबाळे नगर येथील प्यासा हॉटेल च्या पाठीमागे सापळा रचला. गाडीतून आलेल्या तेजस ढेरे याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे यांनी चौकशी केल्यावर त्याने गेली ६ वर्षे फरार असल्याची कबुली दिली. तेजस ढेरे याच्याकडील हुंडाई कंपनीची सॅन्ट्रो कार पोलिसांनी जप्त करुन त्याला चंदननगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त पुनम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, संतोष म्हेत्रे, पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे, अशोक केदार, महेश नाणेकर, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, विलास केदारी, साहेबराव गुंडाळे यांनी केली आहे.

You may have missed