Pune Police News | पोलिसांच्या तत्परतेने ज्येष्ठ नागरिकाचा गळफास घेत जीवन संपविण्याचा अनर्थ टळला
पुणे : Pune Police News | चंदननगर परिसरातील एका सोसायटीतील सदनिकेत ज्येष्ठ नागरिक गळफास घेऊन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा मेसेज मिळाल्यावर पोलिसांनी तत्परतेने तेथे जाऊन या ज्येष्ठ नागरिकाचे प्राण वाचविले.
चंदननगर भागात एका सोसायटीत ज्येष्ठ नागरिक राहायला आहेत. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास महात्मा फुले पोलीस चौकीतील पोलीस अंमलदार तलवारे, सतीश कतारी हे गस्त घालत होते. त्या वेळी पोलीस नियंत्रण कक्षाशी ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने संपर्क साधला. वडील गळफास घेण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस अंमलदार तलवारे, कतारी यांनी संबंधित सोसायटीत धाव घेतली. पोलिसांनी सदनिका शोधून काढली. तेव्हा सदनिकेचा दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर तलवारे आणि कतारी यांनी क्षणाचा विलंब न लावता त्वरित एका वेल्डींग कारागिराशी संपर्क साधला. वेल्डींग कारागिराने आतून बंद असलेला दरवाजा उघडला. त्यानंतर पोलीस कर्मचार्यांनी ज्येष्ठ नागरिक गळफास घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे पाहिले.
पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाला धीर देऊन खाली उतरविले. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीस अंमलदारांनी तातडीने घाव घेऊन ज्येष्ठ नागरिकाला गळफास घेण्यापासून परावृत्त केले. पोलीस अंमलदार तलवारे आणि कतारे यांनी केलेल्या कामगिरीची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना देण्यात आली. पोलीस ठाण्यात दोघांचा सत्कार करण्यात आला, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख यांनी दिली.
