Pune Crime Court News | पुणे : 6 कोटींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन रद्द
पुणे : Pune Crime Court News | ६ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी अरुंधती सुरेश पोटे आणि सुरेश दत्तात्रय पोटे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने रद्द केला आहे. मे. MPID विशेष न्यायालयाने 09 मे 2025 रोजी ७७ लाख रुपये जमा करण्याच्या अटीवर त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.
मात्र, न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही आरोपींनी विविध कारणे देत ही रक्कम जमा करण्यास टाळाटाळ केली. याबाबत मूळ फिर्यादी मेजर मोहनलाल बजाज यांचे वकील ॲड. प्रताप परदेशी आणि ॲड. अभिजीत खांडरे यांनी न्यायालयात ठोस युक्तिवाद मांडला. तसेच शासनाच्या वतीने विशेष सरकारी वकील ॲड. वाडेकर यांनीही बाजू मांडली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश एस. एस. कंठाळे यांनी आरोपींनी जामिनाच्या अटींचे पालन न केल्याचे स्पष्ट करत 27 एप्रिल 2026 रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याचा आदेश दिला.
