Pune Crime News | पुणे : सराईत गुंडाचा खुन करणार्या 5 मित्रांना पोलिसांनी केले जेरबंद; जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्याच्याच पालघनचा वापर करुन काढला काटा
पुणे : Pune Crime News | दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा त्याच्याच मित्रांनी पालघनने वार करुन निर्घुण खुन केला. त्या तिघा गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने काही तासात पकडले. फुरसुंगी पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
आकाश ऊर्फ राणा मोहन कांबळे (वय २६, रा. गंगानगर, फुरसुंगी) असे खुन झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी आदित्य नामेश्वर पिंपळे Aditya Nameshwar Pimple (वय २०, रा. प्रियदर्शनी रेसिडेन्सी, हडपसर), आदित्य कांबळे (वय २०), ओमकार प्रमोद मोरे Omkar Pramod More (वय २३, रा. काळेबोराटेनगर, हडपसर), तडीपार अरुण अनिल यादव Arun Anil Yadav (वय २४, रा. शिवचैतन्य कॉलनी, शेवाळवाडी), दत्ता व्यंकट गिते Datta Venkat Geeta (वय २०, रा. शेवाळवाडी, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत त्याची चुलत बहिण रेखा प्रभाकर कांबळे (वय ४२, रा. लिंबोणीनगर, प्रायव्हेट रोड, पुणे स्टेशन) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना फुरसुंगीमधील रुपीनगर येथील देशमुख पेट्रोल पंपाचे मागील परिसर व महेश वारे यांच्या इमारतीसमोर २८ एप्रिल रोजी रात्री १० वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणा कांबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दरोड्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, चोरी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपार केले होते. राणा हा आरोपींना घेऊन फिरत होता. त्याच्या बरोबरील मित्रांना तो त्रास देत होता. राणा याने पालघन सारखी हत्यारे स्वत: बनवुन घेतली होती. ती त्याने ओंकार मोरे याच्याकडे ठेवायला दिली होती. दोन दिवसांपूर्वी त्याची व ओंकार मोरे याची भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी राणा याच्या डोक्यात, मानेवर, चेहर्यावर, कपाळावर, दोन्ही हातावर पालघनने वार करुन त्याचा खुन केला.
खुनाची घटना समजताच गुन्हे शाखेची विविध पथके, खंडणी विरोधी पथक हे आरोपींचा शोध घेऊ लागली. पोलीस हवालदार सुरेंद्र जगदाळे, नितीन मुंढे, कुसाळकर, अमोल घावटे, पोलीस अंमलदार पवन भोसले यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुन्हा करणारे आरोपी मस्तानी तलावाजवळ अंधारात बसलेले आहे. या माहितीनुसार पोलीस पथकाने मस्तानी तलावाजवळ सापळा रचुन तिघा आरोपींना पकडले. अरुण यादव याला पुणे शहर व जिल्ह्यातून २ वर्षांकरीता तडीपार केले आहे. असे असताना तो शहरात येऊन रहात होता. फुरसुंगी पोलिसांनी अन्य दोन आरोपींना पकडले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस हवालदार सुरेंद्र जगदाळे, हवालदार नितीन मुंढे, कुसाळकर, अमोल घावटे, पोलीस अंमलदार पवन भोसले यांनी केली आहे.
