Pune Crime News | बहिणीला पळून नेल्याने मारहाण केल्याच्या रागातून टोळक्याने घरात शिरुन तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा केला प्रयत्न

Pune Crime News | Out of anger over sister being beaten up for running away, a gang entered the house and tried to kill the young man with a sickle

पुणे : Pune Crime News |  बहिणीचे लग्न केले असतानाही तिला पळवुन नेल्याने भावाने तरुणाला आष्टी येथे मारहाण केली होती. याच्या रागातून टोळक्याने घरात शिरुन कोयत्याने भावावर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या घटनेत आदित्य ऊर्फ सनी राजू गाडे (वय २१, रा. वसंतनगर, केळेवाडी, कोथरुड) हे जखमी झाले आहेत. याबाबत त्यांची पत्नी गायत्री आदित्य गाडे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राहुलसिंग टाक, बु सिंग ऊर्फ अनिलसिंग टाक, पिंटुसिंग दुधाणी, सुखासिंग दुधाणी व इतरांना खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार केळेवाडी येथील वसंतनगरमध्ये ३ मे रोजी रात्री ८ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची नणंद प्रिया गाडे हिचे मार्केटयार्ड येथील राहुलसिंग टाक याच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्या दोघांनी आळंदी येथे जाऊन लग्न केले होते. त्या दोघांनी त्यांच्या पश्चात केलेले लग्न हे गाडे परिवाराला मान्य नसल्याने तिचे लग्न येरवडा येथे राहणारा धीरज रणपिसे याच्याशी केले होते. गेल्या महिन्यात राहुलसिंग टाक याने प्रिया हिला सांगली जिल्ह्यातील आष्टी येथे पळवुन नेले होते. आदित्य गाडे, दीर क्रिश गाडे व प्रिया गाडेचा पती धीरज रणपिसे हे आष्टी येथे गेले. त्यांनी राहुलसिंग टाक याला मारहाण करुन ते प्रिया गाडे हिला घेऊन केळेवाडी येथे आले होते. या मारहाणीचा आष्टी येथे एप्रिल २०२६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३ मे रोजी रात्री ८ वाजता फिर्यादी, त्यांची सासु, पती सनी हे घरी असताना राहुलसिंग टाक, अनिलसिंग टाक, पप्पुसिंग दुधानी, सुखासिंग व इतर त्यांच्या घरात शिरले. त्यावेळी राहुलसिंग टाक याने त्यांना काही कळायचे आत सनी गाडे याच्या डोक्यात कोयता मारला. तो त्यांच्या उजव्या डोक्याचे बाजूला लागला. त्यामुळे सनी गाडे हा घरातून बाहेर निघून पळून जाऊ लागला. हल्लेखोरही त्याच्या मागे धावत गेले. त्यांनी छोटा जवान मित्र मंडळाजवळ सनी गाडे याला गाठले. त्यावेळी अनिलसिंग टाक याने ओरडून ‘‘मार डालो, छोडो मत इसको’’असे बोलून सनी गाडे याच्या डोक्यात वार केला. त्यावेळी सनी याने डावा हात वर केल्याने कोयता त्याच्या हातावर बसला. इतर साथीदारांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर ते मोटारसायकलवरुन पळून गेले. सनी गाडे याला डेक्कन येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

You may have missed