Pune Police News | गुटखा कारवाई न करण्यासाठी 4 लाख रुपये घेणार्या दोघा पोलीस अंमलदारांना शिक्षा
पुणे : Pune Police News | गुटख्याच्या मालाची गाडी लोहियानगरपासून पाठलाग करुन कोरेगाव पार्क या ठिकाणी पकडून त्यांच्याकडून कारवाई न करण्यासाठी ४ लाख रुपये घेणार्या खडक पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस अंमलदारांना पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे गुटखा कारवाई करु नये, म्हणून पैसे घेतल्याचे उघड झाल्यानंतर गनिमी कावा संघटनेमार्फत तक्रारदारांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तक्रारदारांनी शपथ पत्रावर आपला अगोदर दिलेला जबाब फिरविल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
पोलीस अंमलदार आशिष आदिनाथ चव्हाण (Ashish AdiNath Chavan)आणि पोलीस अंमलदार इरफान इमजुद्दीन नदाफ (Irfan Imjuddin Nadaf) अशी त्यांची नावे आहेत. ते दोघे त्यावेळी खडक पोलीस ठाण्यात नियुक्तीला होते.
गुटखा पकडला असताना त्यावर कारवाई करु नये, यासाठी पोलीस अंमलदारांनी ४ लाख रुपये घेतल्याचा प्रकार नोव्हेंबर २०२५ मध्ये समोर आला होता. त्याबाबत खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक यांना चौकशी करण्याचा आदेश दिला होता.
पोलीस अंमलदार आशिष चव्हाण व नदाफ यांनी २२ नोव्हेबर २०२५ रोजी झहिर अन्सारी यांची गुटख्याच्या मालाची गाडी लोहियानगर पासून पाठलाग करुन कोरेगाव पार्क या ठिकाणी पकडली. झहिर अन्सारी याने माल पुरविलेल्या अनिकेत गायकवाड याला कॅम्पमधील त्रिकोणी गार्डन येथे घेऊन जाऊन त्या दोघांकडून बेकायदेशीररित्या ४ लाख रुपये घेतले. पोलीस अंमलदार आशिष चव्हाण व नदाफ यांनी खडक पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात झहीरुद्दीन नावाची व्यक्ती होंडा सिटी या गाडीतून दारुची वाहतूक करीत असल्याची बातमी गोपनीय बातमीदाराकडून समजली असतानाही त्याची शहानिशा व खात्री करण्यापूर्वी बातमीबाबत वरिष्ठांना कळवुन त्याबाबत कायदेशीर स्टेशन डायरी नोंदी घेणे, योग्य अधिकारी व स्टाफसह जाऊन खात्री करणे आवश्यक असताना त्यांनी तसे केलेले नाही. चौकशीमध्ये चव्हाण व नदाफ यांनी बेकायदेशीररित्या गाडी अडवुन त्यांच्याकडून पैसे वसुल केल्याचे स्पष्ट झालेले आहे. या अहवालात पान टपरी चालक अनिकेत गायकवाड याच्या प्रथम जबाबानुसार जप्त करण्यात आलेला माल परत करण्यासाठी चव्हाण व नदाफ यांना गुटख्याची कारवाई न करण्याकरीता त्यांनी ४ लाख रुपये मागितल्याचे जबाबात नमुद केले आहे.
याप्रकरणी तक्रादार अनिकेत गायकवाड यांनी २५ नोव्हेबर २०२५ रोजी दिलेल्या जबाबात त्यांनी केलेल्या तक्रारीपासून त्यांना परावृत्त करण्यासाठी चव्हाण व नदाफ यांनी त्यांच्याशी गनिमी कावा संघटनेचे संजय वाघमारे यांच्यामार्फत संधान साधून या पूर्वी जबाबात नमूद केलेला प्रकार घडलाच नसल्याचे सांगून त्यांना व झहिर अन्सारी यांना त्याचे स्पष्ट मत चौकशीत नोंदविण्याकरीता हस्ते परहस्ते दबाव आणुन त्यांचे म्हणण्यापासून परावृत्त करण्याचा गंभीर प्रकार केला असल्याचे चौकशीत प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. कोरेगाव पार्क ते त्रिकोणी गार्डन या परिसरात येत असताना सीसीटीव्ही फुटेजच्या कक्षे पासून दूरच राहिल, याची खबरदारी घेऊन बेकायदेशीर कृत्य केल्याचे निदर्शनास येत आहे.
फरासखाना सहायक पोलीस आयुक्त यांनी केलेल्या चौकशी अहवालानुसार अनिकेत गायकवाड व झहिर अन्सारी यांनी पोलिसांनी कायदेशीर कारवाई करु नये, म्हणून अवैधरित्या ४ लाख रुपये दिले असल्याचे लेखी जबाब दिलेले होते. असे असताना संघटना मार्फत व शपथपत्रावर पोलिसांनी पैसे दिले नसल्याचे कागदपत्रे सादर केले आहे.
चव्हाण व नदाफ यांनी गंभीर कसुरी केली असतानाही त्यांनी झहिर अन्सारी व अनिकेत गायकवाड व गनिमी कावा संघटनेचे संजय वाघमारे यांच्याशी संगनमत करुन स्वत:वर कारवाई होऊ नये, म्हणून व भविष्यात कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिल्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून अनिकेत गायकवाड व झहिर अन्सारी यांनी यापूर्वी चौकशीमध्ये दिलेली माहिती व जबाब व त्यानंतर त्याने पोलिसांना वाचविण्यासाठी शपथ पत्रामध्ये त्यांनी पूर्वीचे जबाब फिरवलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही अतिशय गंभीर स्वरुपाची बाब आहे. पोलिसांनी पोलीस दबाव व धाकदपटशा दाखवुन पोलीस दलाची जनमानसात प्रतिमा मलिन करुन बेजबाबदारपणाचे वर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी पोलीस अंमलदार आशिष चव्हाण व इरफान नदाफ यांच्या कर्तव्यात कसुरीसाठी पुढील देय वार्षिक वेतनवाढ, पुढील वेतनवाढीवर परिणाम होणार नाही, अशा रितीने २ वर्ष कालावधीसाठी रोखणे अशी शिक्षा दिली आहे.
