Pune Police News | प्राचार्यांना धमकावुन खंडणी उकळणारे PSI अजित बडे, रीलस्टार सोनाली हिंगे यांच्यासह तिघे पोलीस दलातून बडतर्फ; अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी
पुणे : Pune Police News | पोक्सोखाली गुन्हा दाखल करुन बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ७ लाखांची खंडणी उकळणारे पोलीस उपनिरीक्षक अजित त्र्यंबक बडे (Ajit Trimbak Bade), पोलीस अंमलदार सोनाली गुलाबराव हिंगे (Sonali Gulabrao Hinge) आणि सुदाम बाळकृष्ण तायडे (Sudam Balakrishna Tayde) यांना अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी पोलीस दलातून बडतर्फ केले आहे. सोमवारी लाच घेताना दोघा पोलीस अधिकार्यांना निलंबित केले होते. त्या पाठोपाठ तिघांना पोलीस दलातून बडतर्फ केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अजित बडेसह (PSI Ajit Bade) तिघांनी अटक पूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या अर्जावर बुधवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.
हे तिघेही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नियुक्तीला असताना हा प्रकार गेल्या वर्षी घडला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर गेल्या महिन्यात तिघांना निलंबित करण्यात आले होते.
एका प्राचार्यांना अल्पवयीन मुलीने तुमच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. तुमच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होईल, तुमची, संस्थेची बदनामी होईल, अशी भिती दाखविली. त्यासाठी त्यांनी एका अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीकडून तक्रार अर्ज लिहून घेतला होता. अटकेची व बदनामीची भिती दाखवून प्राचार्यांकडून ७ लाखांची खंडणी उकळली होती. या प्रकरणातील अल्पवयीन मुलीला आपल्या कृत्यामुळे प्राचार्यांना लुबाडल्याचे लक्षात आल्यावर तिने आपल्या पालकांसह पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन त्यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर गुन्हे शाखेने त्याचा तपास करुन अजित बडे, सोनाली हिंगे, सुदाम तायडे यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
तक्रारदारास गंभीर स्वरूपाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आल्याचे प्राथमिक चौकशी अहवालावरुन निदर्शनास आल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन होऊन पोलिसांवरील विश्वासाला धक्का बसलेला आहे.
उपलब्ध माहितीवरुन तिघेही फरार असून आपल्या पत्त्यावर उपलब्ध नाहीत. त्यामुळे विभागीय चौकशी अवाजवी रीतीने लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावरील जनतेच्या विश्वासावर परिणाम होण्याची पूर्ण शक्यता आहे. तिघेही पोलीस दलातील सदस्य असल्यामुळे साक्षीदारांवर, विशेषत: अल्पवयीन साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची, धमकाविण्याची किंवा प्रलोभन दाखवण्याची व त्यायोगे विभागीय चौकशी प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेता या प्रकरणात नियमित विभागीय चौकशी चालविणे वाजवीरित्या शक्य नाही, असे आपले मत झाले असल्याचे अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
सार्वजनिक व्यापक लोकहिताच्या तसेच जनतेचा पोलिसांवरील विश्वास टिकून राहावा, या दृष्टिकोनातून शासकीय सेवेत यापुढे कर्तव्यार्थ ठेवणे उचित होणार नाही, याची खात्री झाल्याने त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात आले आहे.
