Pune Crime News | पत्नी घर सोडून गेल्याच्या नैराश्यातून पित्याचे टोकाचे पाऊल; चिमुकल्या मुलीची हत्या, मुलगा थोडक्यात बचावला

Pune Crime News | Father's extreme step due to depression after wife leaves home; Murder of little girl, son narrowly escapes

पुणे : Pune Crime News | कौटुंबिक वाद आणि पत्नी घर सोडून गेल्याच्या नैराश्यातून एका पित्याने स्वतःच्या चिमुकल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे-नाशिक महामार्गालगतच्या संतवाडी परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी सागर सदाशिव शिंदे (वय २९, रा. मोशी, पुणे) याला अटक केली आहे. प्राथमिक तपासानुसार, आरोपीची पत्नी सुमारे सहा महिन्यांपूर्वी घर सोडून गेली होती. त्यानंतर दोन लहान मुलांचा सांभाळ करताना तो मानसिक तणावाखाली होता.

५ मे रोजी सकाळी आरोपीने मुलगा आर्यन (वय ५) आणि मुलगी हर्षदा (वय ३.५) यांना फिरायला घेऊन जात असल्याचे सांगून घराबाहेर नेले. रात्री उशिरा त्याने संतवाडी येथील निर्जन जंगल परिसर गाठला. तेथे प्रथम मुलगा आर्यनचा गळा दाबून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. आर्यन बेशुद्ध पडल्याने तो मृत झाल्याचे समजून आरोपीने त्याला जंगलात टाकून दिले.

यानंतर आरोपीने मुलगी हर्षदाचा गळा आवळून तिची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी तिचा मृतदेह झाडाझुडपात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

बुधवारी सकाळी जंगल परिसरात आर्यन बेवारस अवस्थेत आढळल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. चौकशीत आरोपी सागर शिंदे याच्यावर संशय बळावला. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र कसून चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार खून आणि खुनाच्या प्रयत्नाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

You may have missed