Daund Pune Crime News | मार्कशीटमधील खाडाखोड जीवावर बेतली; संतापलेल्या पित्याकडून 9 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या, नंबर 1 चा होता अट्टहास
दौंड : Daund Pune Crime News | पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. परीक्षेतील गुण आणि मार्कशीटमध्ये केलेल्या खाडाखोडीच्या रागातून एका पित्याने स्वतःच्या ९ वर्षांच्या मुलीची निर्दयीपणे हत्या केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी दौंड पोलिसांनी शांताराम दुर्योधन चव्हाण याला अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपीच्या मुलगा संस्कार आणि मुलगी अनामिका यांचा शाळेचा निकाल नुकताच जाहीर झाला होता. संस्कार वर्गात पहिला आला होता, तर अनामिका दुसऱ्या क्रमांकावर होती. यावरून भावाने चिडवल्याने अनामिका मानसिकदृष्ट्या दुखावली गेली होती.
यानंतर तिने मार्कशीटमध्ये खाडाखोड करत स्वतःला पहिल्या क्रमांकावर आणि भावाला दुसऱ्या क्रमांकावर दाखवल्याचे समोर आले. ही बाब वडील शांताराम यांच्या लक्षात येताच त्यांचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात त्यांनी घरातील लाकूड कापण्याच्या मशीनचा वापर करून मुलीच्या गळ्यावर वार केला. या भीषण हल्ल्यात अनामिकाचा जागीच मृत्यू झाला.
गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने मृतदेह कपड्यात गुंडाळून घरामागील परिसरात नेऊन जाळण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे. मात्र, पोलिसांनी वेळेत घटनास्थळी धाव घेत अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला.
या प्रकरणात पोलिसांनी चिंकी भोसले या महिलेलाही अटक केली आहे. हत्या झाल्याची माहिती असूनही ती लपवून ठेवणे आणि पुरावे नष्ट करण्यात मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे. तसेच मुलीच्या आईविरोधातही माहिती दडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून डीएनए तपासणी केली जाणार आहे. आरोपीविरोधात खून आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
