Pune Crime News | जीवनसाथी साईटवरील ओळखीतून सॉफ्टवेअर तरुणीची 21 लाखांची फसवणुक करणार्या भामट्याला सिंहगड रोड पोलिसांनी केली अटक
21 लाखांच्या बदल्यात 50 लाखांच्या दिल्या नोटा पण त्या निघाल्या खेळण्यातील नोटा
पुणे : Pune Crime News | जीवनसाथी डॉट कॉम या साईटवरील ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवुन पैशांची अडचण सांगून २१ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या बदमाशाने या तरुणीला २१ लाख रुपयांच्या बदल्यात ५० लाख रुपयांच्या नोटा दिल्या. पण, त्या खेळण्यातील नोटा निघाल्या.
गोरखनाथ भाऊ गावंडकर Gorakhnath Bhau Gawandkar (वय ४१, रा. कडसुरे,ता. रोहा, जि. रायगड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत नांदेड सिटी येथे राहणार्या एका ३२ वर्षाच्या तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मार्च २०२५ पासून आतापर्यंत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने जीवनसाथी डॉट कॉम या विवाहविषयक साईटवर नोंदणी केली होती. त्यातून गोरखनाथ गावंडकर याच्याशी ओळख झाली. गोरखनाथ गावंडकर याचे पालघर येथे रेस्टॉरंट, बार आहे. ही तरुणी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तिच्या भावाचा छत्रपती संभाजीनगर येथे व्यवसाय आहे. त्याच्याशीही गोरखनाथ याची ओळख झाली. त्यांच्या भेटीगाठी झाल्या. दरम्यान, एके दिवशी गोरखनाथ याने या तरुणीकडे १ लाख रुपये मागितले. तिने पैसे दिले. त्याने ४ दिवसांनी पैसे परत केले. त्यामुळे त्यांचा गोरखनाथ याच्यावर विश्वास बसला. त्याने या तरुणीला आपण लग्न करुया, असे आमिष दाखविले.
नव्या कामामधून पैसे मिळणार आहेत, त्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे, असे सांगत त्याने तरुणीकडून २१ लाख रुपये घेतले. काही दिवसांनी या तरुणीने पैशांचे काय झाले, कधी परत करणार अशी विचारणा केली. तेव्हा त्याने सिंहगड रोड येथील अतिथी हॉटेलमध्ये तिला फोन करुन बोलावले. तिला काळ्या रंगाची लेदरची बॅग दिली. यामध्ये ५० लाख रुपये आहेत. त्यातून तुमचे २१ लाख घ्या, राहिलले पैसे मला आरटीजीएस करा, असे सांगून तो निघून गेला. त्यानंतर या तरुणीने बॅगेची पाहणी केली असता बॅगेमध्ये लहान मुलांच्या खेळण्यामधील नोटा असल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम यांनी सांगितले की, गोरखनाथ गावंडकर याची आई पुण्यात राहते. तो तिच्या घरी आल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम तपास करीत आहेत.
याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सांगितले की, या आरोपीने विवाहविषयक साईटवरुन आणखी काही तरुणींशी संपर्क साधून लग्नाचे आमिष दाखवुन फसवणुक केली आहे, याचा पोलीस तपास करीत आहेत.
