Pune Crime News | पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकांना दोघा भामट्यांनी अडीच लाखांना घातला गंडा; शहरात सातत्याने होत आहे ज्येष्ठ नागरिकांची फसवणुक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | वॉकिंगहून घरी परत येत असताना पोलीस असल्याची बतावणी करुन दोघा भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील अंगठी काढून रुमालात बांधून देण्याचा बहाणा करुन हातचलाखीने अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला़

याबाबत कोथरुडमधील कल्याणी सोसायटीत राहणार्‍या एका ६२ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना डुक्कर खिंड येथील इम्पेरिअल प्लाझा येथील सार्वजनिक रोडवर १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नेहमीप्रमाणे सायंकाळी फिरायला गेले होते. घरी परत येत असताना डुक्कर खिंड येथील इम्पेरिअल प्लाझा या इमारतीसमोर ते आले असताना दुचाकीवरुन दोघे जण आले. त्यांनी पोलीस असल्याची बतावणी केली. सध्या अंगावरील दागिने चोरुन नेण्याचे प्रकार वाढले आहे. तुमच्या गळ्यातील चैन व अंगठी काढून ठेवा, असे म्हणाले. त्यांनी गळ्यातील सोन्याची चैन व अंगठी असा २ लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज काढला. तेव्हा त्यांच्यातील एकाने रुमालात बांधून देतो, असे सांगून त्यांच्याकडून दागिने घेतले. रुमाल बांधताना हातचलाखी करुन दागिने काढून घेऊन रुमालाला गाठ मारुन त्यांच्याकडे रुमाल दिला. त्यानंतर ते पटकर निघून गेले. त्यांनी रुमाल उघडून पाहिला तर त्यात काहीच नव्हते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे, पोलीस उपनिरीक्षक तरडे, नरळे, रायगोंडा यांनी घटनास्थळी भेट दिली. जेथे ही घटना घडली, त्याच्या जवळपास कोणतेही सीसीटीव्ही नाही. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करीत आहेत.                              

पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिक, महिला यांना भिती दाखवुन त्यांच्या अंगावरील दागिने चोरुन नेण्याचे अनेक प्रकार गेल्या काही दिवसात शहरातील विविध भागात घडले आहे. परंतु, त्यापैकी एकाही गुन्ह्याचा तपास अद्याप लागू शकलेला नाही. नागरिकांनी अशा तोतया पोलिसांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

You may have missed