Pune Crime News | 42 महिने पगार न मिळाल्याने वॉचमनने आपले जीवन संपविले; सिंहगड कॉलेजचे मारुती नवले, सुनंदा नवलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | सिंहगड कॉलेजमध्ये गेल्या ४२ महिन्यांपासून पगार न दिल्याने कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने एका वॉचमनने संस्थेच्या आवारात आपले जीवन संपविले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले (Maruti Nivruti Navale), सचिव सुनंदा मारुती नवले (Sunanda Maruti Navle), उपाध्यक्ष रचना नवले ऊर्फ अष्टेकर (Rachna Navle alias Ashtekar), सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष रोहित मारुती नवले (Rohit Maruti Navle) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. समीर दाभोळकर (वय ५३, रा. स्वराज हाईटस, साईनगर, हिंगणे खुर्द) असे आपले जीवन संपविलेल्या सिक्युरिटी गार्डचे नाव आहे. ही घटना सिंहगड कॅम्पसमधील रायगड हॉस्टेल येथे १३ मे रोजी दुपारी घडली. मुलगा वृषभ समीर दाभोळकर (वय २२) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर दाभोळकर हे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे सिक्युरिटीमध्ये १५ जून २००२ पासून सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांना २०१६ व २०१८ या दोन वर्षाचा पगार संस्थेकडून मिळाला नसल्याचे त्यांनी घरात अनेक वेळा बोलून दाखविले. पगार न मिळाल्याने त्यांनी अनेकांकडून उधारीवर पैसे घेतले होते. तसेच पत्नीचे मंगळसुत्र गहाण ठेवून कर्ज काढले होते. त्याचे हप्ते ते अजून भरत आहेत. त्यांनी पगारासाठी अनेकदा संस्थेकडे मागणी केली. परंतु त्यांनी काही ना काही कारणे सांगून टाळाटाळ केली. त्यांना महिना ३५ हजार रुपये पगार आहे. परंतु, मागील दीड वर्षांपासून म्हणजे नोव्हेबर २०२४ पासून त्यांना संपूर्ण पगार कधीही मिळालेला नाही. एक दोन वेळा त्यांना ५ हजार रुपये पगार मिळाल्याचे त्यांनी घरात सांगितले होते. पगार मिळत नसल्याने त्यांनी साईड बिझनेस म्हणून रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करुन लागले.
१३ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता समीर दाभोळकर हे पगार मिळत नसल्याने दैनंदिन खर्चासाठी पैसे कोठून आणायचे, यावरुन ते टेंशनमध्ये होते. दुपारी साडेबारा वाजता ते रिक्षा चालविण्यासाठी घरातून बाहेर पडले. त्यांनी दुपारी व्हॉटसअॅपवर एक टेस्टसवर एक व्हिडिओ ठेवला. “मृत्यु हा केवळ शेवटचा क्षण असतो. खरी शोकांतिका तर जिवंतपणी हरलेल्या मनाची असते.” त्यांच्या पत्नीने दुपारी अडीच वाजता हा व्हिडिओ पाहिला. त्यांनी पत्नीच्या मोबाईलवर दोन व्हिडिओ पाठविले होते. त्यात ते म्हणाले की, साक्षी मला माफ कर, पगार मिळत नसल्याने मी जीवन संपवित आहे. पत्नीने त्यांना कॉल केला तर, फोन लागला नाही. ते जेथे काम करत होते, त्या सिंहगड कॉलेजमध्ये जाऊन चौकशी केली.
परंतु, कोणीही त्यांच्या विषयी माहिती दिली नाही. तेव्हा त्यांनी वडगाव पोलीस चौकीत धाव घेतली. तेथील पोलिसांनी शेवटचे लोकेशन तपासले. ते रायगड हॉस्टेल येथे मिळाले. दोन पोलीस व त्यांचे नातेवाईक यांनी तेथे जाऊन शोध घेतला. हॉस्टेलमधील तळमजल्यावरील रुम नंबर २३ मध्ये समीर दाभोळकर यांनी आपले जीवन संपविले होते. त्यांना २०१७ व २०१८ या दोन वर्षाचा तसेच १८ महिन्यांचा पगार थकल्याने व तो नियमित पूर्ण मिळत नसल्याने त्यांनी आपले जीवन संपविले. त्याला जबाबदार असणारे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले, सचिव सुनंदा मारुती नवले, उपाध्यक्ष रचना नवले ऊर्फ अष्टेकर, उपाध्यक्ष रोहित मारुती नवले व संस्थेचे इतर विश्वस्त, ट्रस्टी जबाबदार असल्याची फिर्याद मुलाने दिली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते तपास करीत आहेत.
