Pune Crime News | पुणे : ‘तू तक्रार दे, सुटून आल्यावर तुझा मर्डर टाकतो, माझ्याकडे बंदूक आहे’ युवकाने दिली धमकी; तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन केले जबर जखमी
पुणे : Pune Crime News | एका युवकाने साथीदाराच्या मदतीने तरुणाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले.
याबाबत राज रवींद्र बामणे (वय २४, रा. गोसावी वस्ती, वैदुवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. राज बामणे यांच्यावर ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी दीपक ऊर्फ दिवीज राहुल चव्हाण Deepak alias Divij Rahul Chavan (वय २०, रा. शिंदे वस्ती, मेगा मिलमागे, मगरपट्टा, हडपसर), ऋतिक चव्हाण, तेजय गोरे व शेखर (सर्व रा. मगरपट्टा, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मगरपट्टा सिटीचे मागील गेटमध्ये १३ मे रोजी दुपारी ३ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज बामणे हे फर्निचर रिपेरिंगचे काम करतात. सहा महिन्यांपूर्वी फिर्यादी आणि दीपक चव्हाण यांच्यामध्ये भांडणे झाली होती. तेव्हा राज बामणे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. राज बामणे हे १३ मे रोजी दुपारी मगरपट्टा सिटी मधील मागील बाजूचे गेटजवळ आले. त्यावेळी तेथे दीपक चव्हाण, ऋतिक चव्हाण, तेजस गोरे, शेखर व दोन महिला उभे होते. दीपक याच्या हातात कोयता होता. त्याने राज याची गाडी थांबवली. त्यानंतर घावला की नाही, असे बोलून त्यांच्या डोक्यात कोयता मारला. राज खाली पडला, त्याच्या डोक्यातून खूप रक्त येत होते. ऋतिक, शेखर, तेजस यांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ऋतिक याने त्यांच्या अवघड जागेवर लाथ मारली. त्यामुळे ते जोरजोरात ओरडू लागले. तेव्हा लोक जमा झाले. तेव्हा दीपक याने ‘‘तू पोलिसात तक्रार दे, सुटून आल्यावर परत तुझा मर्डर टाकतो, माझ्याकडे बंदुक आहे, तुला गोळ्या घालतो,’’अशी धमकी देऊन ते तेथून पळून गेले. त्यानंतर त्यांनी मित्रांना फोन करुन बोलावून घेतले. त्यांनी राज बामणे यांना रुग्णालयात दाखल केले. पोलीस उपनिरीक्षक विनोद साने तपास करीत आहे.
