Pune Crime News | पुणे : येरवडा जेलमधून पलायन करणाऱ्या जन्मठेपेच्या कैद्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या मुसक्या
पुणे : Pune Crime News | येरवडा कारागृहातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पळून गेला होता. त्याला गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने भवानी पेठेतून जेरबंद केले.
जनार्दन शंकर अडसुळ Janardan Shankar Adsul (वय ३५, रा. म्हसोबा मंदिराशेजारी, कासेवाडी, भवानी पेठ) असे या कैद्याचे नाव आहे. आत्याची तब्येत खुप खराब असल्यामुळे आत्याला बघण्यासाठी तो खुल्या कारागृहातून पळला होता.
जनार्दन अडसुळ याने २०१७ मध्ये खुन केला होता. खडक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला या गुन्ह्यात २०२३ मध्ये जन्मठेपेची शिक्षा लागली होती. त्याचे वर्तन चांगले असल्याने त्याला शेती कामासाठी खुल्या कारागृहात ठेवले होते. तेथून तो १२ मे २०२६ रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत सर्वांची नजर चुकवून पळून गेला होता. येरवडा पोलीस ठाण्यात त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. १४ मे रोजी गुन्हे शाखेचे पोलीस पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, उमेश मठपती यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, कारागृहातून पळालेला कैदी आता कासेवाडी येथील म्हसोबा मंदिराजवळ थांबला आहे. त्यानुसार पोलीस पथक तेथे पोहचले. त्यांनी १४ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, त्याच्या आत्याची तब्येत खूप खराब असल्याची माहिती मिळाली. त्यातून तिला भेटण्यासाठी कोणास काही एक न सांगता पळून आलो आहे. त्याला पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, उमेश मठपती, निलेश साबळे, अविनाश दळवी यांनी केली आहे.
